मॉडेल रिद्धिमा पाठकसह भावावर फसवणुकीचा गुन्हा
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 28, 2024 18:51 IST2024-06-28T18:50:39+5:302024-06-28T18:51:02+5:30
Nagpur : ऑस्ट्रेलियाच्या एस्टिमेट इलेक्ट्रिकल कंपनीची तक्रार

Fraud case against brother with model Riddhima Pathak
राकेश घानोडे
नागपूर : ऑस्ट्रेलियातील एस्टिमेट इलेक्ट्रिकल कंपनीच्या तक्रारीवरून नागपूर शहर सायबर पोलिसांनी मॉडेल, अभिनेत्री, वॉइस आर्टिस्ट व अँकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिद्धिमा पाठक व त्यांचा भाऊ इशान पाठक यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४२०, ४६७ व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
रिद्धिमा व इशान हे पुणे येथील रिस्विच टेक्नॉलॉजीज कंपनीचे संचालक आहेत. एस्टिमेट इलेक्ट्रिकलने रिस्विच टेक्नॉलॉजीजकडून इलेक्ट्रिशियनना त्यांच्याकडील कामाच्या खर्चाचा अंदाज सांगणारे सॉफ्टवेयर विकसित करून घेतले होते. दरम्यान, रिद्धिमा व इशान यांनी वेळोवेळी बनावट बिले तयार करून एस्टिमेट इलेक्ट्रिकलकडून जास्त रक्कम उकळली. त्यामुळे एस्टिमेट इलेक्ट्रिकलने रिस्विच टेक्नॉलॉजीसोबतचा करार रद्द केला. त्यानंतर एस्टिमेट इलेक्ट्रिकलला थकीत बिल देण्यास विलंब झाल्यामुळे रिद्धिमा व इशान यांनी त्यांचे पेमेंट गेटवे हॅक केले व विशिष्ट शुल्क जमा करून त्यांच्याशी जुळलेल्या ग्राहकांची रक्कम परत केली, असा आरोप आहे.
सायबर पोलिसांनी सुरुवातीला एस्टिमेट इलेक्ट्रिकलच्या तक्रारींची दखल घेतली नव्हती. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी सुनील शिंदे यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या न्यायालयाने दि. १४ जून रोजी एस्टिमेट इलेक्ट्रिकलचे आराेप दखलपात्र असल्याचे नमूद करून ती तक्रार मंजूर केली आणि सायबर पोलिसांना रिद्धिमा व इशान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, येत्या तीन महिन्यांत तपासाचा अहवाल सादर करण्यास सांगितले. परिणामी, सायबर पोलिसांनी दि. २६ जून रोजी एफआयआर दाखल केला. एस्टिमेट इलेक्ट्रिकलच्या वतीने ॲड. इशांत तांबी यांनी कामकाज पाहिले.