कोलकात्यातील कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 07:12 AM2022-02-12T07:12:00+5:302022-02-12T07:15:02+5:30
Nagpur News कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकासोबत दगाबाजी करून त्याची फसवणूक करणाऱ्या नागपुरातील एक तर कोलकाता येथील दोघांविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
नागपूर - कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकासोबत दगाबाजी करून त्याची फसवणूक करणाऱ्या नागपुरातील एक तर कोलकाता येथील दोघांविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. हेमंत कनोजिया आणि सुनील कनोजिया तसे शक्ती रॉय अशी या आरोपींची नावे आहेत. कनोजिया हे कोलकाता येथील मशिनरी निर्माण करणाऱ्या तसेच ती विकत घेणाऱ्यांना कर्ज देणाऱ्या कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत तर रॉय या कंपनीचा उपाध्यक्ष आहे.
राणाप्रतापनगरातील रहिवासी योगेश ज्ञानेश्वर नागपुरे (वय ४२) यांची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यांना २०१५ मध्ये काही कामांचे कंत्राट मिळाले. त्यामुळे त्यांनी शक्ती रॉय तसेच हेमंत कनोजिया आणि सुनील कनोजिया नामक आरोपींच्या कंपनीकडून ६ मशिन खरेदीचा करार करून त्यासाठी ७ कोटी ५ लाखांचे कर्ज घेतले. दरम्यान, हा व्यवहार झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या कामांपैकी काही कंत्राट रद्द झाले. त्यामुळे नागापुरेने शक्ती रॉयला काही मशिन परत केल्या तर काही विकून टाकल्या. त्यानंतर आरोपींनी ९८.६५ लाख रुपये शिल्लक असल्याचे नागपुरेंना कळविले. ती रक्कम दिल्यानंतर १३, ४२९ रुपये शिल्लक असल्याचे लिखित स्वरूपात कळविले. नागपुरेंनी आरोपिंना१४ हजार रुपये देऊन एनओसी मागितली. यावेळी आरोपींनी तुमच्याकडे ५.४३ कोटी रुपये बाकी असल्याचे सांगून एनओसी देण्यास नकार दिला.
कोऱ्या चेकचा गैरवापर
नागपुरेंनी आरोपींना काही कोरे चेक दिले होते. त्यावर ३, ०४, ९०, ७६२ रुपयांची रक्कम टाकून ते चेक बँकेत जमा केले. चेक बाऊंस झाल्यानंतर आरोपींनी नागपुरेंना कोंडीत पकडून त्यांची बदनामी करण्याचाही प्रयत्न केला. २४ सप्टेंबर २०१५ पासून आरोपींसोबत सर्व व्यवहार पारदर्शी करून त्याचे पुरावे ठेवल्यानंतरही आरोपी विश्वासघात करत असल्याचे लक्षात आल्याने नागपुरेंनी प्रारंभी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला.
न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल
नागपुरेंनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे नागपुरातील आरोपी रॉय तसेच कोलकाता येथील हेमंत कनोजिया आणि सुनील कनोजिया या तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, अंबाझरी पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुरुवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
----