बोगस बँक गॅरंटी देऊन कंत्राटदाराची फसवणूक : बँक मॅनेजरने ५० लाखांचा लावला चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:59 PM2019-02-20T23:59:49+5:302019-02-21T00:00:26+5:30
अडीच कोटी रुपयाची बोगस बँक गॅरंटी देऊन एका शासकीय कंत्राटदाराची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी कोलकातातील शकुंतला पार्क येथील आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर सगनिंग रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अडीच कोटी रुपयाची बोगस बँक गॅरंटी देऊन एका शासकीय कंत्राटदाराची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी कोलकातातील शकुंतला पार्क येथील आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर सगनिंग रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रोफेसर कॉलनी, भुसावळ येथील मनोज बियानी हे शासकीय कंत्राटदार आहेत. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील तलावाचे खोलीकरण करण्याच्या निविदा जारी झाल्या होत्या. या कामाच्या निविदेचे मूल्य १५ कोटी ५० लाख ६४ हजार इतके होते. बियानी यांनी या निविदेसाठी महाजेनकोमध्ये अर्ज केला. त्यांना महाजेनकोकडे २ कोटी ५० लाख रुपयाची बँक गॅरंटी जमा करावयाची होती. बियानी यांनी त्यांचे परिचित सल्लागार श्रीहरी तलाशिया यांनी बँक गॅरंटी बनवून देण्याची तयारी दर्शविली. तलाशिया यांनी यासाठी बियानी यांना २५ लाख रुपये मागितले. बियानी यांनी त्यांना ऑनलाईन २५ लाख रुपये ट्रान्सफर केले. तलाशिया यांनी बँक गॅरंटी बनविण्याचे काम आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर सगनिंग रॉय यांना दिल्याचे सांगितले. तलाशिया यांच्या माध्यमातून बियानी यांनी रॉय यांच्याशी संपर्क केला. रॉयनेसुद्धा बियानी यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. परंतु रॉय यांनी बियानी यांना बोगस बँक गॅरंटी बनवून पाठविली. बियानी यांनी ती महाजेनकोकडे जमा केली. महाजेनकोने याची चौकशी केली असता, ती बँक गॅरंटी बोगस असल्याचे उघडकीस आले. बियानी यांना धक्काच बसला. त्यांनी तलाशिया व रॉय यांना विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. यानंतर बियानी यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही बँक गॅरंटीची चौकशी केली. त्यातही ती बोगस असल्याचे उघड झाले. या आधारावर पोलिसांनी रॉयविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
हिरे व्यापाऱ्याची ६० लाखांनी फसवणूक
घराची विक्री करून एका हिरा व्यापाºयाची ६० लाखाने फसवणूक करण्यात आली. बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमित परमेश्वर धुपे (३८) रा. रडके ले-आऊट असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारकर्ते श्याम काशीप्रसाद बोरोले (५५) रा. खरे टाऊन, धरमपेठ आहे. सूत्रानुसार बोरोले हिरे व्यापारी आहेत. त्यांनी अमित धुपे याच्याशी त्याच्या घराचा सौदा केला होता. बोरोलेने धुपेला ५९ लाख ७५ हजार रुपये दिले होते. धुपेने विक्रीपत्रासह बोरोले यांना कब्जापत्रही दिले होते. यानंतरही धुपे याने ते घर रामभाऊ भुसारे यांना विकण्याचा सौदा केला. याची माहिती होताच बोरोले यांनी तक्रार दाखल केली. बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
स्पोर्ट्स बाईकच्या नावावर १० लाखांची फसवणूक
जुन्या स्पोर्ट्स बाईकच्या विक्रीचा सौदा करून जामनगर येथील एका व्यक्तीने १० लाखाची फसवणूक केली.
काटोल रोड येथील रहिवासी असलेल्या आसिफ अब्दुल अजीज यांनी जामनगर, गुजरात येथील मत्सुकिन जुनेजा यांच्याशी जुनी स्पोर्ट्स बाईक खरेदी करण्याचा सौदा केला होता. आसिफने जुनेजाला ऑक्टोबर २०१८ मध्ये १० लाख रुपये दिले होते. यानंतर आसिफ बाईकची वाट पाहू लागला. परंतु जुनेजाने बाईक पाठवली नाही. तेव्हा आसिफ आपले पैसै परत मागू लागला. पैसे परत करण्यासाठी जुनेजा टाळाटाळ करीत असल्याने आसिफने वाडी पोलिसात तक्रार दाखल केली. जुनेजाने यापूर्वीही आसिफला बाईक पाठवली असल्याने तो वेळेवर बाईक देईल, याचा त्याला विश्वास होता.