पुण्यातील डॉक्टरांची फसवणूक; मुलीची एमबीबीएसला ऍडमिशन करून देण्याची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 09:07 PM2021-10-01T21:07:09+5:302021-10-01T21:07:50+5:30
Nagpur News पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याच्या मुलीची एमबीबीएसला ऍडमिशन करून देतो, अशी थाप मारून येथील एका टोळीने त्यांचे ४१ लाख रुपये हडपले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याच्या मुलीची एमबीबीएसला ऍडमिशन करून देतो, अशी थाप मारून येथील एका टोळीने त्यांचे ४१ लाख रुपये हडपले. आरोपींची ठगबाजी लक्षात आल्यानंतर गुरुवारी संबंधित महिला डॉक्टरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. (Fraud of doctors in Pune; Girl's admission to MBBS)
शिल्पा सुरेश ढेकळे (वय ४४) असे फसगत झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. पुण्याच्या नाशिक मार्गावर गुलविहार कॉलनीत त्या राहतात. विशेष म्हणजे त्यांचे पतीही डॉक्टर आहेत. मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळावा म्हणून त्या दोन वर्षांपासून प्रयत्नशिल आहेत. आरोपी सचिन कश्यप याने ७ सप्टेंबर २०१९ ला त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. नंतर मुलीच्या ऍडमिशनचा विषय असल्याने कश्यप सोबतच श्रीकांत, साखरे आणि चंद्रशेखर आत्राम यांच्याशी डॉ. शिल्पा ढेकळे यांचा ऑनलाईन संपर्क आला. प्रारंभी केरळला आणि नंतर नागपुरातील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये तुमच्या मुलीची एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला ऍडमिशन करून देतो, अशी बतावणी या भामट्यांनी केली. त्यांना नागपुरात बोलविले. नंतर प्रवेश प्रकियेतील वरिष्ठांशी मित्रत्व असल्याची आणि प्रत्यक्ष संबंध असल्याचे भासवून डॉ. ढेकळेंना जाळ्यात ओढले.
आरोपींच्या थापेबाजीला बळी पडून डॉ. ढेकळे यांनी सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत चक्क ४१ लाख रुपये दिले. रक्कम घेतल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली ईकडे तिकडे फिरवून आरोपींनी टाईमपास केला. वेळोवेळी विसंगत माहिती देऊन आरोपी टाळाटाळ करू लागल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी संबंधितांकडे चाैकशी केल्याने आरोपींची ठगबाजी त्यांच्या लक्षात आली.
मुलीची ऍडमिशन होणार नाही, असे वाटू लागल्याने डॉ. ढेकळे यांनी आपली रक्कम त्यांना परत मागितली. मात्र, रक्कम देण्याच्या नावाखालीही बरीच टाळाटाळ केल्यानंतर आरोपींनी ढेकळे यांच्याशी सचिन, श्रीकांत आणि साखरेने संपर्क तोडला. आत्राम नुसतीच थापेबाजी करू लागला. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ढेकळे यांनी गुरुवारी सायंकाळी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार विजय तलवारे यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.
ऑन रेकॉर्ड एकच लाख
विशेष म्हणजे, ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरोपींनी पैसे आधीच लागेल, असे सांगितले होते. त्यानुसार, डॉ. ढेकळे यांनी प्रारंभी एक लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. नंतर आरोपींनी सांगितल्याप्रमाणे नागपुरातील मेडिकल चाैकात येऊन स्वताच्या कारमध्ये ४० लाख रुपये रोख स्वरूपात दिले.