वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक, डॉक्टरसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: November 30, 2024 01:23 AM2024-11-30T01:23:24+5:302024-11-30T01:24:49+5:30
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
नागपूर : वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका कंपनीच्या संचालकासह दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
डॉ.अतुल रमेश इंगोले (३८, श्रीकृष्ण नगर, हुडकेश्वर) आणि व्यंकट रेड्डी (हैदराबाद) अशी आरोपींची नावे आहेत. रेशीमबाग येथे डॉ. इंगोले पिपललिंक प्लेसमेन्ट प्रा.लि. च्या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचे काम करतो. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. इंगोलेकडून व्यंकट रेड्डी याच्या मदतीने परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा दावा करण्यात येत होता. रेड्डीने तो अमेरिकेतील कोलंबस सेंटर युनिव्हर्सिटी बेली येथे सीओ असल्याची बतावणी केली होती. २३ वर्षीय विद्यार्थिनीला अमेरिकेत त्या विद्यापीठात एमबीबीएससाठी प्रवेश देण्याचे आमिष दाखवून दोन्ही आरोपींनी २१.३५ लाख रुपये घेतले. जानेवारी २०२३ मध्ये ती इंगोलेच्या संपर्कात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी तिला प्रवेश दिलाच नाही. ते दरवेळी उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करत होते. विद्यार्थिनीने पैसे परत मागितले असता आरोपींनी अमेरिकन विद्यापीठांच्या नियमांचा हवाला देत पैसे परत करण्यास असमर्थता व्यक्त केली. यात तिचे दोन वर्ष वाया गेले. अखेर तिने कुटुंबियांसोबत सक्करदरा पोलीस ठाणे गाठले व तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्यांनी जपून करावे व्यवहार
केवल पिपललिंक प्लेसमेन्ट प्रा.लि.च नाही तर याअगोदर नागपुरात आणखी एका खाजगी कंपनीने विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले होते. संबंधित आरोपीविरोधात सीबीआयने गुन्हादेखील दाखल केला होता. मात्र ते प्रकरण थंडबस्त्यात गेले आहे. संबंधित आरोपीने जुने कार्यालय बंद करून टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळ नवीन कार्यालय उघडत परत गोरखधंदा सुरू केला. राजकीय ‘कनेक्शन’ वापरून त्याने तपास थंडबस्त्यात टाकला असल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर अव्वाच्या सव्वा पैसे आकारणाऱ्या अशा खाजगी कंपन्यांशी जपूनच व्यवहार करणे आवश्यक आहे.