नागपुरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:42 PM2019-02-12T13:42:25+5:302019-02-12T13:42:50+5:30
कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या नावांखाली एका आरोपीने अनेकांचे लाखो रुपये हडपल्याची बाब नागपुरात सोमवारी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या नावांखाली एका आरोपीने अनेकांचे लाखो रुपये हडपल्याची बाब नागपुरात सोमवारी उघडकीस आली. मंजूनाथ व्यंकटेश मूर्ती उर्फ पाटील (वय ५१) असे आरोपीचे नाव आहे. तो मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगजवळच्या पावनभूमीतील प्रगती हाऊसिंग सोसायटीत राहतो. त्याने फसविलेल्या १९ जणांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
सोनेगाव पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पाटील हा गरजूंना झटपट कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवायचा. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या मालमत्तेची कागदपत्रे मागून घ्यायचा. त्याचा सर्च व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळवण्याच्या नावाखाली रक्कम उकळायचा. नंतर स्थावर मालमत्तेचे गहाण खत रजिस्टर करण्यासाठी स्टॅम्प ड्युटीच्या नावाखाली कर्जाच्या रकमेच्या १ टक्का रक्कम घ्यायचा. त्याने अशा प्रकारे १९ जणांकडून सर्च व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळवण्याच्या नावाखाली ४ लाख, ४४ हजार, १०० रुपये हडपले. नंतर स्टॅम्प ड्युटीच्या नावाखाली तिघांकडून ७ लाख, ३० हजार रुपये उकळले. १५ नोव्हेंबर २०१८ ते २० डिसेंबर २०१८ या कालावधीत त्याने कुणाकडून रोख तर कुणाकडून धनादेश घेऊन एकूण ११, ७४, १०० रुपये उकळले. त्याचप्रमाणे राकेश गणेशप्रसाद दुबे (वय ४७) यांच्याकडून ६८, ६७६ रुपयांचे तीन लॅपटॉप नेले. मात्र, कुणालाही त्याने कसलेही कर्ज मिळवून दिले नाही. त्याची बनवाबनवी उघड झाल्यानंतर नितीन अशोक दीक्षित (वय ४०, रा. श्रीनगर, नरेंद्रनगर) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.