आर्थिक तंगीत असलेल्या दिव्यांगाची लाखो रुपयांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 07:30 PM2020-06-10T19:30:30+5:302020-06-10T19:37:14+5:30
रेल्वेमध्ये साहित्याची विक्री करून एक एक रुपया गोळा केला. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एका कंपनीच्या डीलरला लाखो रुपये दिले. परंतु डीलरने फसवणूक केल्याने, इमामवाड्यातील एक दिव्यांग न्यायासाठी पोलिसांची विनवणी करतो आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद असल्याने त्याचा रोजगारही बुडाला आहे. दिव्यांगाची आर्थिक फसवणूक करणारा भामटा मात्र मोकाट फिरतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेमध्ये साहित्याची विक्री करून एक एक रुपया गोळा केला. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एका कंपनीच्या डीलरला लाखो रुपये दिले. परंतु डीलरने फसवणूक केल्याने, इमामवाड्यातील एक दिव्यांग न्यायासाठी पोलिसांची विनवणी करतो आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद असल्याने त्याचा रोजगारही बुडाला आहे. दिव्यांगाची आर्थिक फसवणूक करणारा भामटा मात्र मोकाट फिरतो आहे.
विष्णू शंकर डोंगरे असे या दिव्यांगाचे नाव आहे. विष्णू दृष्टिहीन आहेत. ते रेल्वेमध्ये विविध साहित्याची विक्री करून कुटुंबाचा गुजारा करतात. इमामवाडा येथील झोपडपट्टीमध्ये किरायाच्या घरात पत्नी व दोन मुलांसह ते राहतात. विष्णूने रेल्वेत साहित्य विकून पै-पै जमविली आणि पत्नीच्या मदतीने नवीन रोजगार सुरू करावा म्हणून ते प्रयत्नरत होते. त्यांनी श्री लक्ष्मीनारायण ट्रेडर्सने प्रसिद्ध केलेली एक जाहिरात बघितली. या जाहिरातीमध्ये कापसाच्या वाती करण्याची मशीन कंपनी उपलब्ध करून देणार होती. सोबतच कापसाच्या वाती ५ वर्षे खरेदी करणार होती. विष्णूकडून त्या कंपनीचा डीलर संतोष कांबळे याने १,३२,९५५ रुपये घेतले. २०० रुपये प्रमाणे विष्णूने कापूसही खरेदी केला. या कापसाच्या वाती ७०० रुपये प्रमाणे संतोष कांबळे विकत घेणार होता. परंतु विष्णूला त्याने दिलेली मशीन खराब निघाली. त्याने मशीनचे गॅरंटी वॉरंटीचे दस्तऐवज दिले नाही. विष्णूसोबत केलेला ५ वर्षाचा करारही बनावट निघाला. आपण फसल्याचे लक्षात आल्यानंतर विष्णूने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याला इमामवाडा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. इमामवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी संतोष कांबळे व विष्णू यांचे बयाण लिहून घेतले. पोलिसांनी संतोष कांबळे याला पैसे परत दे असे सांगितले. मात्र संतोषने एक रुपयाही त्यांना दिला नाही. त्यामुळे आता विष्णू पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. पोलिसांकडूनही त्यांना टाळले जात आहे.
लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार हिरावला आहे. घरात कुटुंबीयांची उपासमार होत आहे. अशात पोलिसांनी संतोष कांबळेकडून पैसे परत मिळवून द्यावे, अशी अपेक्षा विष्णूची आहे. अशा आपत्तीच्या काळात या दृष्टिहीनाच्या पाठीशी कुणीही उभा नसल्याने तो हतबल झाला आहे.