नागपूर जिल्ह्यात ‘एटीएम कार्ड’द्वारे फसवणूक; अनोळखी व्यक्तींवरील विश्वास अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:47 AM2018-03-28T10:47:35+5:302018-03-28T10:47:46+5:30

हल्ली बँक खातेदारांच्या ‘आॅनलाईन’ फसवणुकीसोबत त्यांना विश्वासात घेत मदत करण्याचा बहाणा करीत त्यांच्याकडील ‘एटीएम कार्ड’ची अदलाबदली करणे आणि पीन नंबर माहीत करून रकमेची परस्पर उचल करण्याचे प्रकार वाढले आहे.

Fraud in Nagpur through ATM card; Confidence of strangers is risky | नागपूर जिल्ह्यात ‘एटीएम कार्ड’द्वारे फसवणूक; अनोळखी व्यक्तींवरील विश्वास अंगलट

नागपूर जिल्ह्यात ‘एटीएम कार्ड’द्वारे फसवणूक; अनोळखी व्यक्तींवरील विश्वास अंगलट

Next
ठळक मुद्देसहा महिन्यात दीड लाख रुपये लंपास

अरुण महाजन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हल्ली बँक खातेदारांच्या ‘आॅनलाईन’ फसवणुकीसोबत त्यांना विश्वासात घेत मदत करण्याचा बहाणा करीत त्यांच्याकडील ‘एटीएम कार्ड’ची अदलाबदली करणे आणि पीन नंबर माहीत करून रकमेची परस्पर उचल करण्याचे प्रकार वाढले आहे. खापरखेडा (ता. सावनेर) परिसरात गेल्या सहा महिन्यात आठ बँक खातेदारांची फसवणूक करीत चोरट्यांनी १ लाख ६० हजार ४०० रुपये लंपास केले. हे आठही जण भारतीय स्टेट बँकेचे खातेदार आहेत. अशा पद्धतीने रक्कम चोरून नेणारी टोळी या परिसरात सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यातील एकाही घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत बँक व पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते.
हे चोरटे एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना हेरतात. काही जण ग्राहकांना पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करतात तर काही एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची बतावणी करतात. याच चर्चेदरम्यान ते ग्राहकांचा विश्वास संपादन करीत त्यांच्याकडील मूळ ‘एटीएम कार्ड’ची हातचलाखीने अदलाबदल करतात. हे सर्व करीत असताना चोरटे ग्राहकांच्या मूळ कार्डचा पीन नंबरदेखील लक्षात ठेवतात. त्यानंतर ते मूळ कार्ड व पीन नंबरचा वापर करून एटीएममधून रकमेची उचल करतात.
काही प्रकारात चोरटे ग्राहकांनी ‘एटीएम कार्ड’ स्वॅप करून मशीनमध्ये पीन नंबर टाकल्यानंतर मशीनमध्ये ‘एरर’ असल्याची बतावणी करतात. मूळ कार्ड बदलवून ग्राहक गेल्यानंतर रकमेची उचल करतात. चोरट्यांनी या पद्धतीने सहा महिन्यात आठ जणांची १ लाख ६० हजार ४०० रुपयांनी फसवणूक केली आहे.

सुरक्षा रक्षकांची कमतरता
खापरखेडा व परिसरातील बहुतांश बँकाच्या एटीएम मशीनमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. या संदर्भात बँक खातेदारांनी बँक व्यवस्थापनाकडे निवेदने देऊन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची मागणीही केली होती. एखाद्या ग्राहकाला मशीनमधून पैसे काढण्यास काही अडचण आल्यास तो अनोळखी व्यक्तीची मदत घेण्यापेक्षा सुरक्षा रक्षकाची मदत घेईल. त्यामुळे त्याची फसवणूक होणार नाही. परंतु, बँक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

गर्दी चोरट्यांच्या पथ्यावर
खापरखेडा येथील बहुतांश बँकांची एटीएम मशीन १०० चौरस फूट खोलीत बसविण्यात आली आहे. काही खोल्यांमध्ये दोन ते पाच मशीन असून, काही ठिकाणी पासबुक प्रिंट मशीन व पैसे डिपॉझिट मशीन बसविण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याचदा या छोट्याशा खोलीत २५ पेक्षा अधिक ग्राहक उभे असल्याचे नेहमीच दिसून येते. ही गर्दी चोरट्यांच्या पथ्यावर पडत असून, ते ग्राहकांची सहज फसवणूक करतात. त्यामुळे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

नोटा खराब असल्याची बतावणी
हातचलाखीत रक्कम लंपास करण्याचे प्रकार पूर्वी बँक शाखांमध्येही घडले आहेत. चोरटे सावज हेरून त्यांना नोटा खराब किंवा नकली किंवा नोटांना रंग लागला असल्याची बतावणी करीत ग्राहकांना विश्वासात घेतात. नोटा मोजून देण्याची बतावणी करीत त्या स्वत:कडे घेतात. नोटा मोजताना काही रक्कम हातचलाखीने काढून उर्वरित रक्कम ग्राहकांच्या सुपूर्द करतात व लगेच निघून जातात. हा प्रकार ग्राहकांच्या लक्षात येईपर्यंत चोरटा बेपत्ता झालेला असतो. हा प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही पोलिसांना चोरट्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही.

Web Title: Fraud in Nagpur through ATM card; Confidence of strangers is risky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम