आधार क्रमांक ‘लिंक’च्या नावावर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:56+5:302020-12-08T04:08:56+5:30
कन्हान : बँक खाते, एटीएम कार्ड, आधार क्रमांक यासह अन्य गाेपनीय माहिती देणे अंगलट येत असल्याचा अनुभव नुकताच कन्हान ...
कन्हान : बँक खाते, एटीएम कार्ड, आधार क्रमांक यासह अन्य गाेपनीय माहिती देणे अंगलट येत असल्याचा अनुभव नुकताच कन्हान परिसरातील बँक खातेदाराला आला. त्याने निनावी फाेन काॅलवर विश्वास ठेवत माेबाईलवर प्राप्त झालेल्या ‘लिंक’वर ‘क्लिक’ करीत आधार क्रमांक जाेडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या बँक खात्यातून २५ हजार १७६ रुपयांची परस्पर उचल करीत त्याची फसवणूक करण्यात आली.
रविशंकर शिवप्रसाद पाल (२४, रा. इंदर काॅलनी, टेकाडी, ता. पारशिवनी) यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कन्हान शाखेत बचत खाते आहे. त्यांना चार दिवसापूर्वी फाेन आला. संबंधित व्यक्तीने त्यांना फाेनवर विश्वासात घेत ‘तुमचा माेबाईल क्रमांक २४ तासांनी बंद हाेणार आहे. ताे नियमित सुरू ठेवण्यासाठी आपण माेबाईलवर पाठवीत असलेल्या ‘लिंक’वर ‘क्लिक’ करून त्यावर आधार क्रमांक ‘अपलाेड’ करायचा आहे, त्यानंतर ताे फाॅर्म ‘सबमिट’ करायचा आहे’ अशी सूचना केली.
रविशंकर यांनी त्या अनाेळखी व्यक्तीने सांगितलेल्या सूचनांचे पालन करीत संपूर्ण फाॅर्म भरून ‘सबमिट’ केला. त्यानंतर काही वेळात त्यांच्या बॅंक खात्यातून पहिल्यांदा २० हजार रुपये व नंतर १,१७६ रुपये अशा एकूण २५ हजार १७६ रुपयांची परस्पर उचल करण्यात आली. चाैकशीअंती या प्रकारात फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४२० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक सुरजुसे करीत आहेत.