खताच्या डीलरशिपच्या नावावर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:13 AM2021-08-21T04:13:20+5:302021-08-21T04:13:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : कृषिसेवा संचालकाने रासायनिक खताची डीलरशिप मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला. त्यासाठी त्याला १ लाख ९५ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : कृषिसेवा संचालकाने रासायनिक खताची डीलरशिप मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला. त्यासाठी त्याला १ लाख ९५ हजार ६१८ रुपये बॅंक खात्यात जमा करायला लावले. संबंधित संकेतस्थळ बनावटी असून, या फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्याने पाेलिसात धाव घेतली.
वैभव वसंतराव वांढे (२०, रा.पारशिवनी) यांचे पारशिवनी शहरातील नवीन बस स्थानक परिसरात खापरखेडा राेडलगत कृषिसेवा केंद्र आहे. रासायनिक खते खरेदी करण्यासाठी त्याने काही वेबसाइट सर्च केल्या. यातील एका साइटवर त्याला इफ्फकाे कंपनीची डीलरशिप घेण्याची सूचना करण्यात आली. त्यावर वैभवने फाेन नंबर नाेंदविल्याने त्याला फाेनवर संपर्कही करण्यात आला.
त्याने संबंधित व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवत, २२ जून ते ४ ऑगस्ट या काळात संबंधिताच्या बॅंक खात्यात १ लाख ९५ हजार ६१८ रुपये टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बॅंक खात्यात जमा केली. यासाठी त्याने त्याच्या आईच्या भारतीय स्टेट बॅंक व बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतील रकमेचा वापर केला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैभवने युरियाची मागणी नाेंदविली.
युरियाच्या बॅग न मिळाल्याने त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे चाैकशी केली, तेव्हा ती साइट कंपनीची अधिकृत साइट नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे त्याने पाेलिसात तक्रार दाखल केली. ती बनावट साइट अमितकुमार नावाच्या व्यक्तीने तयार केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी भादंवि ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा सहकलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक संदीप कडू करीत आहेत.