फिफा वर्ल्ड कपच्या नावावर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:35 AM2020-12-17T04:35:45+5:302020-12-17T04:35:45+5:30
- कंत्राट मिळवून देण्याच्या नावावर फसवले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फिफा वर्ल्ड कपसाठी स्टेडियम निर्माणात प्लायवूड पुरवठ्याचे कंत्राट ...
- कंत्राट मिळवून देण्याच्या नावावर फसवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फिफा वर्ल्ड कपसाठी स्टेडियम निर्माणात प्लायवूड पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्याची लालूच दाखवून एका व्यापाऱ्याला २.६५ लाखाने ठगवल्याचे प्रकरण पुढे आले आहे. सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
शिवाजीनगर, अंबाझरी निवासी प्रशांत मुरलीधर नायडू यांची प्लायवूड कंपनी आहे. त्यांना फेब्रुवारी महिन्यात कतर येथील कथित राजू एन्टरप्रायजेस मधून ई-मेल आला. ई-मेलमध्ये कतर येथे होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी स्टेडियम निर्माण करण्यात येणार असल्याने, या कामासाठी प्लायवूड आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी राठी यांच्या कंपनीची निवड करण्यात आल्याचा उल्लेख होता. त्यासाठी राठी यांना निविदा भरण्यासाठी सांगण्यात आले. राठी यांना ऑनलाईन निविदाही पाठविण्यात आली. यासोबतच ३५०० डॉलर जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यासाठी मुंबईच्या फर्मचा खाते क्रमांक देण्यात येऊन, त्यात रक्कम जमा करण्यास सांगितले गेले. त्याच अनुषंगाने राठी यांनी २.६५ लाख रुपये संबंधित खात्यात वळते केले. त्यानंतर राठी यांना पुन्हा ८ हजार डॉलर जमा करण्यास सांगण्यात आले. टेंडर देण्याऐवजी केवळ पैशाचीच मागणी होत असल्याने राठी यांना संशय आला. त्यामुळे, त्यांनी आधी जमा केलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. तेव्हापासून आरोपींनी राठी यांच्याशी संपर्क तोडला. राठी यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपींच्या खात्यात झिरो बॅलेन्स असल्याचे स्पष्ट झाले असून, अन्य लोकांनाही अशाच तऱ्हेने फसविल्याचा संशय बळावला आहे. पोलीस मुंबईच्या बँक खात्याच्या आधारावर आरोपींचा शोध घेत आहेत.
.......