विमान कंपन्यांमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली युवकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 02:58 PM2021-12-16T14:58:46+5:302021-12-16T15:04:52+5:30
बोगस कंपन्या प्रारंभी नोकरी देण्याच्या नावाखाली संबंधितांचे ‘लोगो’ वापरून भुरळ पाडणाऱ्या जाहिराती देतात. त्याकडे युवक आकर्षित होऊन नोंदणी करतात. नंतर प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली थोडथोडे पैसे वसूल करून त्यांची लाखोंनी फसवणूक केली जाते.
नागपूर : नागपूर विमानतळ आणि विविध विमान कंपन्यांमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली काही बोगस संस्था आणि कंपन्या युवकांची फसवणूक करीत आहेत. या संस्था व कंपन्या प्राधिकरण आणि विमान कंपन्यांच्या खऱ्या ‘लोगो’चा सर्रास उपयोग करीत असल्याची बाब पुढे आली. फसवणूक झालेले युवक विचारपूस करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत आहेत.
युवकांची अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्याचे फसवणूक झालेल्या युवकांकडून कळत आहे. नोकरीची अपेक्षा बाळगून असणारे अनेक युवक दरदिवशी फसत आहेत आणि नोंदणी वा अन्य नावाखाली त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात आहेत. ही बाब सर्वच क्षेत्रात वाढली आहे. त्यानंतरही प्राधिकरण वा विमान कंपन्यांनी युवकांना दक्ष करणारी विशेष पावले उचलल्याचे दिसून येत नाही.
गेल्या काही दिवसांपासून फसवणूक झालेले अनेक युवक नियुक्तीपत्र घेऊन विमानतळावर येत आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आलेले युवक विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडे तक्रार करतात. या संदर्भात विमानतळ व्यवस्थापनाने सोनेगांव पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंदविल्या आहेत.
बोगस कंपन्या प्रारंभी नोकरी देण्याच्या नावाखाली संबंधितांचे ‘लोगो’ वापरून भुरळ पाडणाऱ्या जाहिराती देतात. त्याकडे अनेक युवक आकर्षित होतात. प्रथम नोंदणी करतात. नंतर प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली थोडथोडे पैसे वसूल करून लाखोंची फसवणूक करतात. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते तोपर्यंत अनेक महिने निघून गेलेले असतात. त्यानंतर या कंपन्या अन्य शहरात जाहिराती देऊन नवीन सावज शोधतात. याआधीही नवीन पेट्रोल पंप वा गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली वृत्तपत्रात मोठ्या जाहिराती देऊन अनेकांची लाखोंची फसवणूक झाली आहे. या संदर्भात पोलिसांनी केवळ तक्रारी नोंदविल्या आहेत. त्याचे पुढे काहीच झालेले नाही. खऱ्या ठकबाजांना शोधण्यासाठी पोलीस कारवाई करीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.