नागपुरात फ्लॅट विक्रीच्या नावाखाली फसवणूक : १० लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 08:21 PM2020-08-04T20:21:35+5:302020-08-04T20:22:46+5:30
फ्लॅट विक्रीचा सौदा करून १० लाख रुपये घेतल्यानंतर विक्रीपत्र करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि आत्महत्येची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फ्लॅट विक्रीचा सौदा करून १० लाख रुपये घेतल्यानंतर विक्रीपत्र करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि आत्महत्येची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काशीद खान सलीम खान पटेल (वय ३४) असे आरोपीचे नाव असून तो झिंगाबाई टाकळीतील रजत एनक्लेव्हमध्ये राहतो. काशीद खानने २०१८मध्ये वर्धा येथील रहिवासी शादाब इस्माईल खान (वय २६) यांच्यासोबत फ्लॅट विक्रीचा सौदा केला होता. करारनामा केल्यानंतर २० डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत आरोपी काशीद खान याने शादाब कडून १० लाख रुपये घेतले. मात्र त्याने फ्लॅटची विक्री करून दिली नाही त्यांनी. विक्रीपत्रासाठी शादाबने काशीदकडे तगादा लावला असता त्याने ‘त्रास दिला तर आत्महत्या करेन आणि तुम्हाला फसवील’ अशी धमकी दिली. रक्कमही परत केली नाही. त्यामुळे शादाबने काशीबविरुद्ध मानकापूर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. उपलब्ध कागदपत्राच्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. काशीदची चौकशी सुरू आहे.