नागपुरात भूखंड विक्रीच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 01:11 AM2020-08-02T01:11:07+5:302020-08-02T01:13:21+5:30
भूखंड विक्रीच्या नावाखाली २९ भूखंडधारकांची फसवणूक करून त्यांच्याकडून सुमारे दीड ते दोन कोटी रुपये हडपणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूखंड विक्रीच्या नावाखाली २९ भूखंडधारकांची फसवणूक करून त्यांच्याकडून सुमारे दीड ते दोन कोटी रुपये हडपणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आनंद हरिभाऊ सायरे (वय ७०) यांच्या तक्रारीनुसार, या फसवणूक प्रकरणात तीन आरोपी आहेत. प्रशांत शिवकुमार सहारे, अनिता अशोक मेश्राम आणि वनिता विकास ढोणे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी अनिता आणि वनिता या दोघींच्या मालकीचे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ले-आऊट आहे. मिहान प्रकल्पाला लागून हे ले-आऊट असून येथे कमी पैशात भूखंड विकत घ्या आणि अल्पावधीतच तुम्हाला त्याचे दामदुप्पट परतावे मिळतील, असे आरोपींनी सांगितले होते. त्यानुसार आनंद सायरे तसेच अन्य २८ जणांना आरोपींनी इसासनीतील भूखंड विकले. २६ नोव्हेंबर २००८ ते जानेवारी २०१६ पर्यंत आरोपींनी हा व्यवहार करून वेगवेगळ्या व्यक्तीकडून वेगवेगळी रक्कम घेतली. आरोपींनी भूखंड घेणारांकडून रक्कम घेतल्यानंतर त्यांना विक्रीपत्र करून दिले. मात्र ताबा दिला नाही. भूखंडाचा ताबा मिळावा म्हणून सायरे आणि अन्य भूखंडधारक आरोपींकडे चकरा मारत होते. मात्र आरोपी टाळाटाळ करायचे. त्यामुळे संशय आल्याने भूखंडधारकांनी चौकशी केली असता आरोपी प्रशांत सहारे, अनिता मेश्राम आणि वनिता ढोणे या तिघांनी आपसात संगनमत करून ही फसवणूक केल्याचे लक्षात आले. आरोपींनी वृद्ध सायरे यांच्याकडून चार लाख रुपये घेतले. अन्य २८ जणांकडून नेमकी रक्कम किती घेतली ते उघड झाले नाही. मात्र ती रक्कम दीड ते दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समजते. सायरे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
घरच्यानेच केली दगाबाजी
तक्रारदार सायरे आणि आरोपी प्रशांत सहारे हे नातेवाईकच आहेत. आरोपी सहारे हा सायरे यांना काका म्हणतो. त्यानेच वृद्ध सायरे यांच्यासोबत दगाबाजी करून फसवणूक केली आहे.