शेअर बाजाराच्या नावाखाली सहा मित्रांना ३८ लाखांनी गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 03:25 PM2023-03-16T15:25:09+5:302023-03-16T15:25:32+5:30
शेअर बाजाराऐवजी क्रिकेट सट्ट्यात लावला पैसा; गुंतवणूकदारांनाच धमकी
नागपूर : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास खूप जास्त नफा मिळेल, अशी बतावणी करत एका तरुणाने सहा मित्रांना तब्बल ३८ लाखांना गंडा घातला. त्याने शेअर बाजाराऐवजी प्रत्यक्षात क्रिकेटच्या सट्ट्यात पैसा लावला आणि गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यास नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे पैसे परत मागितले असता गुंतवणूकदारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
आशिष चंद्रकुमार टेकानी (२९, तुलसीनगर कॉलनी, शांतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने विलास पुणेकर (३२, गोळीबार चौक), शिवकुमार गुप्ता, आशिष भोयर, प्रवीण धार्मिक, गजानन उमरेडकर, आकाश सूर्यवंशी या सहा मित्रांना गंडा घातला. सिव्हिल कंत्राटदार असलेल्या पुणेकर यांची टेकानीशी ओळख झाली. टेकानीने शेअर बाजाराची कामे करत असल्याचा दावा केला व काही मोठी नावे घेतली. यावरून पुणेकर यांना विश्वास बसला. त्यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये त्याला गुंतविण्यासाठी अडीच लाख रुपये दिले. सात दिवसांतच टेकानीने २.८० लाख परत केले. ३० हजारांचा नफा झाल्याने पुणेकर यांचा विश्वास बसला व त्यांनी त्यांच्या मित्रांनादेखील ही बाब सांगितले.
परताव्याच्या मोहात मित्रांनी एकूण २० लाख रुपये टेकानीला दिले. काही तांत्रिक कारणांमुळे ते पैसे शेअर बाजारात अडकल्याची थाप टेकानीने मारली. त्यानंतर सर्व मित्रांनी त्याच्या सांगण्यावरून आणखी १८ लाख रुपये त्याला दिले. त्यानंतर त्याला पैशांचे काय झाले असे विचारले असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पुणेकर यांनी चौकशी केली असता तो क्रिकेट सट्ट्यात सर्व पैसे हरला असून शेअर बाजाराचे कुठलेही काम करत नसल्याची बाब समोर आली. त्याला त्यानंतर पैसे परत मागितले असता त्याने पुणेकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तो पैसे परत करत नसल्याचे पाहून अखेर पुणेकर यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी टेकानीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
चहाच्या टपरीवरील ओळख भोवली
पुणेकर यांची टेकानीशी २०२१ साली चहाच्या एका टपरीवर ओळख झाली होती. टेकानीने तेथे मोठमोठ्या बाता मारल्या होत्या. त्यानंतर त्याने पुणेकर यांना लॅपटॉपवर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन दिले होते. यावरून पुणेकर प्रभावित झाले होते.