आरडी, एफडीत कोट्यवधींचा गंडा; ठकबाज प्रदीप खंगार विरोधात अखेर गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: July 24, 2024 04:23 PM2024-07-24T16:23:56+5:302024-07-24T16:24:31+5:30
Nagpur : २०२२ पासून खातेदारांची रक्कम भरली नसल्याची माहिती; हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोट्यवधींची आरडी व एफडीची रक्कम घेऊन फरार झालेल्या ठकबाज प्रदीप खंगार विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठकबाज खंगारने शेकडो ठेवीदारांकडून आरडी आणि एफडीएच्या नावे पैसे घेतले. मात्र त्यांच्या टपाल खात्यात जमा केले नाही. रायपूर ग्रामपंचायत येथील रहिवासी प्रदीप खंगारने पत्नीच्या नावावर टपाल खात्याची एजन्सी घेतली. लोकांच्या घरी जाऊन तो बचत योजनांसाठी पैसे गोळा करीत होता. पंचवीस ते तीस वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत असल्याने खातेदारांचा विश्वास संपादन केला होता. दैनंदिन पैसे वसुलीसाठी तो फिरायचा. अचानक २७ जून २०२४ पासून तो बेपत्ता झाला. त्यामुळे ग्राहकांनी टपाल कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्याने २०२२ पासून खातेदारांची रक्कम भरली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी पोलीस स्टेशन हिंगणा येथे तक्रार केली. शेकडो गुंतवणूकदारांची त्याने फसवणूक केली होती. चिंतीत गुंतवणूदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला हिंगणा पोलीस ठाणे गाठले होते. मात्र खंगार बेपत्ताच होता. या प्रकरणात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नलिनी पुरुषोत्तम ताबुलकर (५२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रदीप व त्याची पत्नी वंदना खंगार (४८) याच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संबंधाचे संरक्षण अधिनीयमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आकडा १० कोटींच्या पुढे
सद्यस्थितीत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात फसवणूकीचा आकडा २.२५ कोटी इतका आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा १० कोटींहून अधिक आहे. खंगार अद्यापही फरारच असून त्याचा शोध सुरू आहे.
ठेवीदार झाले रडवेले
खंगारकडे पैसे सोपविणारे अनेक ठेवीदार हे गरीब किंवा निम्नमध्यवर्गीय कुटुंबातील आहेत. मुलांच्या भविष्यासाठी पोटाला चिमटा काढून लोकांनी पोस्टात बचत होईल या विचारातून खंगारवर विश्वास टाकला होता. मात्र त्याने विश्वासघात केला. आपले पैसे कधी परत मिळणार हा प्रश्न घेऊन ठेवीदार पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत.