नातेवाईकानेच घातली ‘टोपी’, गृहनिर्माण सोसायटीचा बोगस अध्यक्ष बनून प्लॉट खरेदीदाराची फसवणूक
By योगेश पांडे | Published: June 1, 2023 03:40 PM2023-06-01T15:40:44+5:302023-06-01T15:41:48+5:30
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : एका गृहनिर्माण सोसायटीचा अध्यक्ष असल्याची बतावणी करत एका केबल व्यावसायिकाला विश्वासात घेत त्याची पाच लाखांहून अधिक रकमेने फसवणूक करण्यात आली. संबंधित ठकबाजाने दोन दलालांसह मिळून अगोदर विक्री झालेल्या प्लॉटचीच परत विक्री केली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रफुल्ल मैदळकर (४८,मनिषनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते वर्धा मार्गाजवळ प्लॉटच्या शोधात होते. मैदळकर यांचा नातेवाईक असलेला अन्केष सहरकार (नंदनवन) व सुशिल टोंगे (छोटा ताजबाग) या दोघांनी त्यांच्याकडे प्लॉट असल्याचे सांगितले. त्यांनी मैदळकर यांची भेट रमेश ठाकरे (सुर्वे ले आऊट, ताजबाग) याच्याशी करवून दिली व ठाकरे हा ओमशांती गृहनिर्माण सहकारी संस्थेचा अध्यक्ष असल्याची बतावणी केली.
चिचभवनमधील तीन हजार चौरस फुटांहून अधिक मोठा असलेला प्लॉट तिघांनी मैदळकर यांना दाखविला. २० लाखात सौदा ठरला व मैदळकर यांनी पाच लाख रुपये दिले. तिघांनीही प्लॉटचा करारनामा करून दिला. मात्र त्यात सोसायटीच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. ज्यावेळी मैदळकर प्लॉटवर फलक लावायला गेले तेव्हा तो प्लॉट अगोदरच कुणीतरी विकत घेतल्याची बाब त्यांना कळाली. याबाबत त्यांनी तिघाही आरोपींना विचारणा केली असता त्यांनी ते मान्य केले. त्यांनी पैसे परत देण्याची तयारी दाखविली. मात्र त्यांनी दिलेला धनादेश वटलाच नाही.
मैदळकर यांनी ठाकरेला फोन केला असता त्याने पैसे परत देत नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. मैदळकर यांनी शासकीय कार्यालयात चौकशी केली असता ठाकरे हा संस्थेचा अध्यक्षच नसल्याची बाब समोर आली. अखेर त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी ठाकरे, सहरकार, टोंगे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.