आदिवासींचे प्लॉट्स विकून १० लाखांची फसवणूक, एसएसआर लँड डेव्हलपर्सच्या संचालकांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 01:18 PM2022-07-02T13:18:44+5:302022-07-02T13:21:10+5:30
फिर्यादीने चौकशी केली असता हे सर्व प्लॉट मुळात शेतजमीन असून, आदिवासींसाठी आरक्षित असल्याची बाब समोर आली.
नागपूर : आदिवासींसाठी आरक्षित असलेले दोन प्लॉट्स विकून एका ज्येष्ठ नागरिक महिलेची तब्बल १० लाखांनी फसवणूक करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणात जरीपटका पोलीस ठाण्यात एसएसआर लँड डेव्हलपर्सच्या तीन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालंदानगर येथील रहिवासी श्यामकुमारे सुरेंद्र श्रीवास्तव (वय ६५) यांना गुंतवणूक करायची होती. एसएसआर लँड डेव्हलपर्सतर्फे देण्यात आलेली प्लॉटविक्रीची जाहिरात त्यांच्या वाचण्यात आली. त्यांनी संचालक शैलेंद्र मोहन मेश्राम (४२, सुमेधनगर), रोहित विद्याधर खापर्डे (३५, सिद्धार्थनगर), सुमित श्रीधर खापर्डे (३७, सिद्धार्थनगर) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी घोटी खसरा क्रमांक ११० येथे तीन प्लॉट दाखविले. पवन जामतानी या एजंटच्या माध्यमातून याबाबत सौदा झाला.
जानेवारी २००९ ते डिसेंबर २०११ या कालावधीत श्रीवास्तव यांनी आरोपींना पाच लाख ९३ हजार ६९० रुपये दिले. तब्बल आठ वर्षांनंतर आरोपींना त्यांना २०१९मध्ये कब्जापत्र करून दिले. मात्र, रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ करू लागले. २०१० मध्ये रोहित खापर्डे याने त्यांना उमरेड मार्ग, मौजा खापरी (दवा) येथील दोन हजार चौरस फुटांचा आणखी एक प्लॉट दाखविला होता. त्याचा सौदा तीन लाख ६४ हजारात ठरला व श्रीवास्तव यांनी त्याचे पैसे २०११ ते २०१३ या कालावधीत दिले. मात्र, त्याची रजिस्ट्रीदेखील झाली नाही. याबाबत फिर्यादीने चौकशी केली असता हे सर्व प्लॉट मुळात शेतजमीन असून, आदिवासींसाठी आरक्षित असल्याची बाब समोर आली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. जरीपटका पोलिसांनी तीनही संचालकांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
पैसे परत मागितल्यावर धमकी
रजिस्ट्री न करून देता बोगस प्लॉटची विक्री केल्याची बाब समोर आल्यावर श्रीवास्तव यांनी तिनही संचालकांशी संपर्क केला व पैसे परत मागितले. मात्र, तिघांनीही त्यांना शिवीगाळ करीत ‘तुम्हाला पाहून घेऊ’ अशी धमकी दिली. एजंटलादेखील अशाच धमक्या दिल्या. एसएसआर लँड डेव्हलपर्सकडून अशा प्रकारे आणखी काही लोकांची फसवणूक झाली आहे का याचा तपासदेखील पोलीस करीत आहेत.