प्लॉट विक्रीच्या नावावर पोलिसाचीच फसवणूक; २० लाखांचा घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 05:36 PM2022-05-25T17:36:34+5:302022-05-25T17:37:53+5:30
संदीपकडून प्लॉटची रजिस्ट्री करण्यासाठी तकादा लावल्यावर आरोपी टाळाटाळ करू लागले.
नागपूर : दुसऱ्याच्या मालकीचा प्लॉट पोलीस कर्मचाऱ्याला विकून २० लाखांनी फसवणूक केल्याची तक्रार हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी प्रॉपर्टी डिलरसह पाच लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपीचे नाव प्रशांत मनोहर चव्हाण (रा. बेसा), आदित्य धरमदास जांभूळकर (रा. विश्रामनगर), अमोल मधुकरराव साशनकर (रा. न्यू सुभेदार लेआउट), प्रशांत केशवराव उरकुडे (रा. मेहरबाबानगर) तसेच देवेंद्र केशव तायवाडे, रा. नालंदानगर आहे.
मानेवाडा येथील रहिवासी संदीप साशनकर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्याची २०२० मध्ये प्रशांत चव्हाण व त्याचा साथीदार आदित्य जांभुळकर याच्याशी भेट झाली. दोघेही प्रॉपर्टी डिलिंगचे काम करीत होते. त्यांचे हुडकेश्वरमध्ये हर्ड डेव्हलपर्स नावाने कार्यालय आहे. त्यांनी आपल्या साथीदारासह संदीप यांना बेसा येथे १४४० चौरस फुटाचा प्लॉट दाखविला. तो आपल्या मालकीचा असल्याचे सांगून त्याची विक्री करण्याचा सांगितले.
संदीपने प्लॉट बुकिंग करून २० नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात २० लाख ४६ रुपये दिले. संदीपकडून प्लॉटची रजिस्ट्री करण्यासाठी तकादा लावल्यावर आरोपी टाळाटाळ करू लागले. या दरम्यान प्रशांतचा विद्युत करंट लागून मृत्यू झाला. आदित्य व अन्य साथीदार गायब झाले. संदीपने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशीनंतर आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.