विद्यापीठात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक : बनावट नियुक्तीपत्र दिले , पावणेतीन लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 12:04 AM2021-05-04T00:04:09+5:302021-05-04T00:06:20+5:30
Fraud by offering job in university बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना नोकरीचे आमिष दाखवीत दोन भामट्यांनी त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपये हडपले. सोमवारी या प्रकरणात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना नोकरीचे आमिष दाखवीत दोन भामट्यांनी त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपये हडपले. सोमवारी या प्रकरणात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कमल संजय तागडे (वय २७) हा अंबाझरीतील चिंतामणी नगरात राहतो. त्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी धीरज प्रकाश राऊत (रा. रामनगर, तेलंखेडी) आणि हाजी शरीफ मोहम्मद शफी (रा. आनंदनगर, वाठोडा) या दोघांनी त्याला गेल्या वर्षी नागपूर विद्यापीठात लिपिकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. विद्यापीठात अनेक वरिष्ठांशी आमची सेटिंग असून, आम्ही अनेकांना नोकरी लावून दिली, अशी थाप त्यांनी मारली. आरोपींवर विश्वास ठेवून तागडेने त्याला आपली कागदपत्रे दिली. त्यानंतर आरोपींनी तागडेच्या एका मित्रालाही अशीच थाप मारून या दोघांकडून दोन लाख ७५ हजार रुपये घेतले. ६ ऑक्टोबर २०२० ला रक्कम घेतल्यापासून आरोपी त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळत होते. नंतर या दोघांना लिपिक पदाचे बनावट नियुक्तपत्र आरोपींनी दिले. २५ जानेवारीला हे पत्र घेऊन तागडे विद्यापीठात गेला असता तेथील अधिकाऱ्यांनी ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगितले. त्याच्या मित्राच्या बाबतीतही असेच झाले. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर तागडे आणि त्याच्या मित्राने आरोपी राऊत, तसेच शरीफला रक्कम परत मागितली. तीन महिने टाळाटाळ केल्यानंतरही आरोपींनी त्यांना रक्कम परत दिली नाही. त्यामुळे तागडे आणि त्याच्या मित्राने सोमवारी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी आरोपी राऊत, तसेच शरीफ विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.
अनेकांची फसवणूक
आरोपी धीरज राऊत आणि हाजी शरीफ या दोघांनी अशाप्रकारे अनेकांकडून रक्कम उकळून त्यांना बनावट नियुक्तपत्र दिल्याचा संशय आहे. पोलीस त्याचीही चौकशी करीत आहेत.