सायबर गुन्हेगारांकडून ‘पीएफ’ आयुुक्तांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:17 PM2020-05-27T19:17:09+5:302020-05-27T19:19:41+5:30
क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आयुक्तांना ३ लाखाने गंडविल्याची घटना सक्करदरा ठाण्याच्या परिसरात घडली आहे. मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत ही घटना घडल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आयुक्तांना ३ लाखाने गंडविल्याची घटना सक्करदरा ठाण्याच्या परिसरात घडली आहे. मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत ही घटना घडल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
विकास कुमार जीवट महाशेट (४३) हे सक्करदऱ्याच्या पीएफ कार्यालयात आयुक्त आहेत. तर जावेद खान, अजय गायकवाड, विशाल अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना ११ मे रोजी घडली. विकास कुमार आपल्या कार्यालयात हजर होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड बंद झाल्याचे सांगितले. विकास कुमार यांनी आपल्या बँक खात्यांची माहिती जाणून घेतली असता त्यांच्या अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डमधून ८३ हजार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डमधून २.१३ लाख रुपये उडविल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच त्यांना धक्का बसला. त्यांनी जावेद खान नावाच्या आरोपीला फोन केला. त्याने दोन्ही खात्यातून काढलेली रक्कम आपल्या खात्यात असल्याचे सांगितले. ही रक्कम मिळविण्यासाठी ५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्याने विकास कुमार यांना गुगल पे आणि पेटीएम खात्यांची माहिती दिली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विकास कुमार यांंनी तीन किस्तीत पाच-पाच हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतरही आरोपी विकास कुमार यांना पैसे मागतच होते. आपली फसवणुक झाल्याची शंका येताच विकास कुमार यांनी सक्करदरा पोलीस आणि सायबर सेलमध्ये तक्रार केली. तपासाच्या आधारे पोलिसांनी फसवणुक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सायबर गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीचा समावेश आहे. त्यांचे जाळे राजस्थान, आसाम, जमशेदपूर, मुंबईसह इतर शहरात पसरले आहे. विकास कुमार यांच्या खात्यातून काढलेली रक्कम अनेक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे.