तोतया वनाधिकाऱ्याकडून फसवणुकीचे रॅकेट, रोजगाराच्या नावाखाली अनेकांना गंडा

By योगेश पांडे | Updated: April 7, 2025 22:17 IST2025-04-07T22:17:33+5:302025-04-07T22:17:46+5:30

आरोपीविरोधात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud racket by impersonating forest officer many people cheated in the name of employment | तोतया वनाधिकाऱ्याकडून फसवणुकीचे रॅकेट, रोजगाराच्या नावाखाली अनेकांना गंडा

तोतया वनाधिकाऱ्याकडून फसवणुकीचे रॅकेट, रोजगाराच्या नावाखाली अनेकांना गंडा

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एका ठकबाजाने वन विभागातील मोठा अधिकारी असल्याची बतावणी करत फसवणुकीचे रॅकेट रचले व अनेक बेरोजगारांना जाळ्यात ओढले. त्याने एका व्यक्तीच्या दोन मुलींची फसवणूक केल्यानंतर हा प्रकार समोर आला. आरोपीविरोधात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय संतोष पाटील (पाचोरा, जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. तर यशवंत नावाच्या व्यक्तीने या प्रकरणात तक्रार केली आहे. पाटीलने त्यांना ऑक्टोबर २०२४ मध्ये फर्निचर बनविण्यासाठी संपर्क केला. त्याच दरम्यान यशवंत यांच्या मुलीच्या मैत्रिणीला वनविभागात नोकरी लागल्याचे कळाले. तिने धनंजय पाटील नावाच्या व्यक्तीमुळे नोकरी लागल्याचे सांगितले. हा पाटील तोच आहे का याची खातरजमा करण्यासाठी यशवंत यांनी त्याला फोन केला. तेव्हा त्याने तो वनविभागात डीएफओ असून तो सहजपणे नोकरी लावून देऊ शकतो असे म्हटले. यशवंत यांनी त्यांच्या दोन मुलींसाठी प्रयत्न करण्यास सांगितले. पाटीलने त्यांना दीड लाख रुपये लागतील असे सांगितले व अखेर ६० हजारांत नोकरी लावून देतो असे सांगितले.

यशवंत यांनी मुलीच्या नावावर कर्ज काढले. त्यावेळी यशवंत हे त्याच्यासोबत दिल्लीत असल्याने त्याने मुलीचे एटीएम कार्ड मागून घेतले. त्यानंतर त्याने दोन्ही मुलींना नोकरी लागल्याचे ऑर्डर दिले. एका मुलीला वनविभागात व दुसरीला पोस्ट खात्यात नोकरी लागल्याची त्याने बतावणी केली व आणखी २० हजार उकळले. त्यानंतर यशवंत यांची एक मुलगी पोस्ट खात्याच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली अहमदाबादला गेली. तेथे पाटीलच्या सांगण्यावरून तिने एका महिलेकडून प्रशिक्षण घेतले. त्यावेळी इतर मुले मुलीदेखील तिथे होते. त्यानंतर त्यांच्या मुलीने वर्धा येथील एका पोस्ट ऑफिसमध्ये दोन जणांसोबत १५ दिवस काम केले. मात्र यशवंत तेथे गेले असता त्यांची मुलगी तेथील नियमित कर्मचारी नसल्याची बाब समोर आली. ३० मार्च रोजी त्यांनी आरोपी पाटीलला फोन केला असता मी तुमची फसवणूक केली आहे, तुम्हाला जे करायचे ते करा असे म्हणत अरेरावी केली. यशवंत यांच्या तक्रारीवरून आरोपी धनंजय पाटीलविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक तरुण-तरुणींची फसवणूक

यशवंत यांच्या एका मुलीचे एटीएम कार्ड आरोपीकडे होते. त्याने अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना जाळ्यात ओढले व त्या एटीएमशी लिंक असलेल्या खात्यावर तो पैसे मागवायचा. त्याचा खरा चेहरा समोर आल्यावर यशवंत यांनी मुलीच्या बॅंक खात्याचे तपशील तपासले असता त्याने तेथून दीड लाख रुपये मागविल्याची बाब लक्षात आली.

मुलीला घरातून उचलून नेण्याची धमकी

हा प्रकार झाल्यावर यशवंत यांनी मुलीचे एटीएम कार्ड परत मागितले. मात्र आरोपीने अगोदर त्यांच्या मुलीला धमकी दिली. तुझ्या वडिलांच्या छातीवर तलवार ठेवून तुला घरातून उचलून नेईल अशी त्याने धमकी दिली.

Web Title: fraud racket by impersonating forest officer many people cheated in the name of employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.