पुरस्काराच्या नावाखाली फसवणुकीचे रॅकेट; नागपुरातून तरुणीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 08:29 AM2023-04-14T08:29:42+5:302023-04-14T08:30:33+5:30

‘लोकमत’ आणि नागपूर महापालिकेच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्याचे फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील महिला सदस्याला सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने बुधवारी अटक केली.

Fraud racket in the name of award Young girl arrested from Nagpur | पुरस्काराच्या नावाखाली फसवणुकीचे रॅकेट; नागपुरातून तरुणीला अटक

पुरस्काराच्या नावाखाली फसवणुकीचे रॅकेट; नागपुरातून तरुणीला अटक

googlenewsNext

नागपूर :

‘लोकमत’ आणि नागपूर महापालिकेच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्याचे फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील महिला सदस्याला सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने बुधवारी अटक केली. हिमांशी राजकुमार कोठेकर (शांतीनगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद बेलसरे याचा पोलिस शोध घेत आहेत.

सोशल मीडियावर दोन पोस्टर टाकून या टोळीने मानकापूर इनडोअर स्टेडियममध्ये मे महिन्यात लोकमत आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचा दावा केला होता. या सोहळ्याला अभिनेत्री रश्मिका मंदाना, कियारा अडवाणी उपस्थित राहणार असल्याचे सांगत शहरातील काही ब्युटिशियन्सना पुरस्कार देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. 

असा झाला प्रकार उघडकीस
ब्युटिशियन कीर्ती तिवारी यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधला असता संपूर्ण प्रकरण समोर आले. बुधवारी दुपारी कीर्ती तिवारीचा डमी भाऊ हिमांशी कोठेकरला भेटायला पाठविण्यात आला. त्यावेळी टोळीने पुन्हा १५ हजार रुपयांची मागणी केली. आरोपींनी सांगितल्यानुसार हिमांशी कोठेकर ही डमी भावाला सीताबर्डीच्या मॉलसमोर भेटली. तेव्हा साध्या वेशातील पोलिसांनी हिमांशीला तेथेच पकडले. यावेळी हिमांशी या रकमेची पावती देणार असल्याचा दावा करत राहिली. हिमांशीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यात महाल रहिवासी गोविंद बेलसरे हा मुख्य आरोपी असल्याचे हिमांशीने पोलिसांना सांगितले. त्याच्या सांगण्यावरून ती ब्युटिशियन्सकडून पैसे घेत होती. पोस्टरवर लोकमत आणि मनपा यांचा लोगो असल्याने सर्वांनीच त्यावर विश्वास ठेवला होता. ती जमा केलेले पैसे गोविंदच्या खात्यातच जमा करणार होती.

वाचकांसाठी विनम्र सूचना
मे महिन्यात संबंधित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी पोस्ट ‘लोकमत’च्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात बॉलिवूड सेलिब्रिटीजचे नावही घेण्यात आले आहे. यादरम्यान पुरस्कार देण्याच्या नावाखाली काही लोकांकडून पैशांची मागणी होत असल्याची माहिती समोर येत आहे. ‘लोकमत’ने असा कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नाही. तसेच कोणत्याही बक्षिसासाठी पैशांची मागणी केली जात नाही. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी चौकशी करावी, अशी सर्वांना विनंती आहे. या कार्यक्रमाच्या नावाखाली कुणाचीही फसवणूक झाली, तर त्याला ‘लोकमत’ माध्यम समूह जबाबदार राहणार नाही.

Web Title: Fraud racket in the name of award Young girl arrested from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.