नागपुरात वेकोलिच्या निवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 08:02 PM2020-06-09T20:02:31+5:302020-06-09T20:11:21+5:30
सायबर गुन्हेगारांनी केवायसी करून देण्याच्या नावाखाली वेकोलिच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याचे ५ लाख ९१ हजार लंपास केले. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी केवायसी करून देण्याच्या नावाखाली वेकोलिच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याचे ५ लाख ९१ हजार लंपास केले. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दीपक गजानन राईरकर (वय ६१) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. ते एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णविहार फेस नंबर २ मध्ये राहतात. त्यांना ८ जूनला दुपारी २च्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला. मी पेटीएम ऑफिसमधून बोलतो, असे सांगून आरोपीने राईरकर यांना तुमचे केवायसी झाले नाही. ते तात्काळ करावे लागेल, असे सांगून मी जी माहिती विचारतो ती सांगा आणि मी जसे म्हणतो तसे तुम्ही करा, असे म्हणून आरोपीने त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी नंबर पाठवला. तो ओटीपी नंबर विचारून प्रारंभी आरोपीने त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीला फोन केला तेव्हा तुमची रक्कम लगेच तुमच्या खात्यात जमा होईल, अशी थाप मारून मी सांगतो तसे करा, असे म्हणून आरोपीने पुन्हा त्यांना क्विक रिस्पॉन्स सपोर्ट आप वर जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराने जसे सांगितले तसे राईरकर यांनी केले. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या खात्यातून कधी ४० हजार तर कधी ५० हजार असे एकूण ११ वेळा ५ लाख ९० हजार ९८० रुपये वळते झाले. राईरकर यांनी ही माहिती आपल्या एका मित्राला सांगितली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी राईरकर यांच्या तक्रारीवरून सायबर गुन्हेगारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
इशारा मिळाला होता
विशेष म्हणजे, जेव्हा पहिल्यांदा सायबर गुन्हेगारांनी राईरकर यांना ओटीपी नंबर पाठवला. त्याचवेळी त्यांना एक मेसेज आला. तुम्ही जर ओटीपी नंबर शेअर केला तर तुमच्या खात्यातून ५० हजार रुपये कमी होतील, असा हा इशारा वजा मेसेज होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सायबर गुन्हेगारांच्या थापेबाजीला बळी पडल्यामुळे राईरकर यांना आपले पाच लाख ९१ हजार रुपये गमवावे लागले.