एटीएम लावण्याच्या नावावर सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:43 PM2019-06-12T23:43:26+5:302019-06-12T23:44:04+5:30
‘एटीएम’साठी जागा भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘एटीएम’साठी जागा भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय येलुकर (६६) हे जयदुर्गा सोसायटी बेलतरोडी येथे राहतात. ते सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी २५ मे रोजी एटीएमसाठी जागा भाड्याने हवी असल्याबाबतची जाहिरात पाहिली. त्यात दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावर कथित इंडिया कॅश एटीएम कोलकाता येथील आरोपी आकाश अग्रवाल, श्वेता तिवारी आणि स्नेहा शर्मा ऊर्फ घोष यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी येलुकर यांना १० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. यानंतर त्यांना २० हजार रुपये दरमहा भाडे, नोकरी आणि एक बाईक देण्याचे आमिष दाखविले. रुपये जमा करण्यास नकार दिल्यानंतर तिघांनीही येलुकर यांना फोन करून अॅग्रीमेंट करण्यासाठी दबाव टाकला. त्यांनी शुल्क व विमा पॉलिसीच्या नावावर ५८,६०० रुपये जमा करण्यास सांगितले. येलुकर यांनी ती रक्कम जमा केली. यानंतरही आरोपी त्यांना पैसे जमा करण्यास सांगत होते. तेव्हा येलुकर यांनी पैसे भरण्यास नकार दिला आणि आपले पैसे परत मागितले. यानंतर आरोपींनी संपर्क तोडला. त्यानंतर येलुकर यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. येलुकर आणि त्यांचे कुटुंबीय उच्च शिक्षित आहेत. आरोपीकडून आपली फसवणूक होईल, याचा त्यांना संशय सुद्धा आला नाही. याप्रकारचे अनेक प्रकरण यापूर्वीही उघडकीस आले आहेत. यात दिल्लीतील गुन्हेगारांचा सहभाग राहिलेला आहे. ते सहसा हाती येत नाही.