नागपुरात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 08:19 PM2018-03-28T20:19:00+5:302018-03-28T20:19:13+5:30
एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून शहरातील एका सेवानिवृत्त सहायक उपनिरीक्षक यांना सायबर गुन्हेगारांनी ६ लाख ४१ हजार रुपयाचा चुना लावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून शहरातील एका सेवानिवृत्त सहायक उपनिरीक्षक यांना सायबर गुन्हेगारांनी ६ लाख ४१ हजार रुपयाचा चुना लावला. अजनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
दिलीप बळीराम दुपारे (६६) रा. बॅनर्जी ले-आऊट भगवाननगर असे पीडित सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. दुपारे हे वायरलेस शाखेतून पीएसआय पदावरून सेवानिवृत्त झाले. स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये त्यांचे बचत खाते आहे. त्यांची सेवानिवृत्तीची रक्कम याच खात्यात जमा होती. पोलीस सूत्रानुसार २५ मार्च रोजी दुपारे यांना ९१८२४०९२९१८६ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो एसबीआयचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. दुपारे यांचे एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून ते पूर्ववत करण्यासाठी आवश्यक माहिती विचारली. दुपारे यांना बोलण्यात गुंतवून त्याने पीन नंबरसह एटीएमशी संबंधित सर्व माहिती मिळवली. यानंतर काहीच वेळात आरोपीने इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून दुपारे यांच्या खात्यातून रुपये ट्रान्सफर केले. त्याने वेगवेगळी रक्कम काढून १० ते १२ खात्यांमध्ये ती जमा केली. दरम्यान दुपारे यांना मोबाईलवर पैसे काढण्यात आल्याचे एसएमएस सुद्धा आले. ते पाहिल्यावर दुपारे यांनी आरोपीला फोनसुद्धा केला परंतु त्याने ‘सिस्टीम अपडेट’ होत असल्याचे सांगून दुपारे यांना शांत राहण्यास सांगितले. येत्या २४ तासात अशाप्रकारचे एसएमएस येत राहतील, चिंता करू नका, असे सांगितले. दुपारे यांना तेव्हा काहीच समजले नाही. बँकेत जाऊन विचारपूस करावी असेही त्यांच्या मनात आले, परंतु सुटी असल्याने ते काही करू शकले नाही. या दरम्यान त्यांच्या खात्यातून आरोपीने ६ लाख ४१ हजार रुपये उडवले. यानंतर बँकेत गेल्यावर दुपारे यांना त्यांची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
सायबर गुन्हेगारांची दहशत
या प्रकरण सायबर गुन्हेगारांची दिल्ली किंवा पश्चिम बंगाल येथील टोळी सहभागी असल्याचा संशय आहे. आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यातूनही त्याबाबत संकेत मिळतात. ही टोळी फसवणुकीसाठी दुसऱ्यांच्या खात्यांचा वापर करते. शहरात अशा घटना दररोजच्या झाल्या आहेत. यामुळे सायबर गुन्हेगारांची दहशत पसरली आहे.