हजयात्रेच्या नावाखाली १.७३ कोटीने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:47 PM2021-02-12T22:47:25+5:302021-02-12T22:48:29+5:30
Haj Fraud हजयात्रेच्या नावाखाली १.७३ कोटी रुपयांनी फसवणूक करणारा नाशिकचा टूर ऑपरेटर तहसील पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी मालेगावमध्ये धाड टाकून त्यास अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हजयात्रेच्या नावाखाली १.७३ कोटी रुपयांनी फसवणूक करणारा नाशिकचा टूर ऑपरेटर तहसील पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी मालेगावमध्ये धाड टाकून त्यास अटक केली आहे.
सज्जाद खान इस्माईल खान (४५, रा. मालेगाव, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. कसाबपुरा येथील रहिवासी तौसिफ मजहरचे मोमिनपुरात अस्मारा टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे दुकान आहे. तो नागरिकांना हजयात्रेसाठी पाठवितो. त्यासाठी सज्जादने तौसिफला संपर्क साधला. त्याने २०१६ मध्ये तौसिफला आपल्यासाठी काम करण्यास सांगितले होते. त्याच्या सांगण्यानुसार तौसिफ हजयात्रेसाठी इच्छुक नागरिकांची बुकिंग करीत होता. वर्ष २०१८ मध्ये सज्जादने ३२ नागरिकांना हजयात्रेसाठी पाठविले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तौसिफला त्याच्यावर विश्वास पटला. १४ जुलै २०१७ ते ५ जून २०१९ दरम्यान तौसिफने सज्जादला ४८ नागरिकांकडून वसुल केलेले १.७३ कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून पाठविले. हजयात्रेसाठी महिनाभरापूर्वी विमानाचे तिकीट आणि कागदपत्र मिळतात. कागदपत्र आणि तिकीट न मिळाल्यामुळे तौसिफने सज्जादला संपर्क केला. सज्जादचा फोन बंद असल्यामुळे तौसिफला शंका आली. सज्जादने प्रतिसाद न दिल्यामुळे हजयात्रेकरून तौसिफवर दबाव टाकू लागले. तौसिफने आपला भाऊ साकिबला मालेगावला पाठविले. तेथे सज्जाद पैसे घेऊन फरार झाल्याची माहिती मिळाली. याबाबत तौसिफने तहसील ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सज्जादने यापूर्वी अनेक शहरात नागरिकांना हजयात्रेच्या नावाखाली फसविल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलीस सज्जादचा शोध घेत होते. तहसील पोलिसांना सज्जाद मालेगावात आल्याची सूचना मिळाली. पोलिसांनी योजना आखून त्याला पकडले. पोलिसांनी सज्जादच्या पीडितांना तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. ही कारवाई निरीक्षक जयेश भांडारकर, बळीराम परदेशी, उपनिरीक्षक स्वप्नील वाघ, सहायक उपनिरीक्षक संजय दुबे, सचिन टापरे, अनिल चतुर्वेदी, रंजित बावणे, पुरुषोत्तम गजनाडे, रूपेश सहारे यांनी केली.
संतप्त झाले होते यात्रेकरू
या प्रकरणात पीडितांना फसवणूक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते संतप्त झाले होते. पवित्र हजयात्रेच्या नावाखाली आपली फसवणूक होऊ शकते याची त्यांना कल्पनाही नव्हती. काही पीडितांनी मेहनतीने हजयात्रेसाठी पैसे गोळा केले होते. ऐनवेळी त्यांना सज्जादने फसवणूक केल्याची माहिती मिळाली. सज्जादला पकडल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.