नागपुरात ९० लाखाची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:05 AM2020-07-23T00:05:41+5:302020-07-23T00:07:13+5:30
बोगस दस्तावेज बनवून ९० लाख रुपये किमतीची जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस दस्तावेज बनवून ९० लाख रुपये किमतीची जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साबीर मिया खान (४४) रा. गिट्टीखदान, हितेश रघुवीर अग्रवाल (३८) रा. बैरागीपुरा, एजाज अकबरभाई अन्सारी (३५) रा. गोविंदनगर आणि त्यांचा एक साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. सेमिनरी हिल्स येथील आनंद श्रीवास्तव (५९) यांची गोरेवाडा येथे जमीन आहे. साबीरने हितेश आणि एजाजच्या मदतीने या जमिनीचे बोगस दस्तावेज तयार केले. अज्ञात आरोपीने स्वत:ला श्रीवास्तव असल्याचे सांगून बोगस स्वाक्षरी करून ही जमीन साबीर खान याला विकली. ही रजिस्ट्री महालच्या उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली. याची माहिती होताच श्रीवास्तव यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.