संकटमोचनाच्या दर्र्शनाच्या लालसेने फसवणूक

By admin | Published: May 13, 2016 03:17 AM2016-05-13T03:17:21+5:302016-05-13T03:17:21+5:30

हनुमानजींचे दर्शन घडवितो, असे सांगून एका युवकाचे अडीच हजार रुपये आणि मोबाईलसह १२,५०० रुपयांचा मुद्देमाल दोन भामट्यांनी लंपास केला.

Fraud by the temptation to face crisis crisis | संकटमोचनाच्या दर्र्शनाच्या लालसेने फसवणूक

संकटमोचनाच्या दर्र्शनाच्या लालसेने फसवणूक

Next

नागपूर : हनुमानजींचे दर्शन घडवितो, असे सांगून एका युवकाचे अडीच हजार रुपये आणि मोबाईलसह १२,५०० रुपयांचा मुद्देमाल दोन भामट्यांनी लंपास केला. सीताबर्डीतील जगदीश सावजी भोजनालयाजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
वैभव दीपक खवशी (वय १७) असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कारंजा घाडगे (जि. वर्धा) येथील रहिवासी असून, नागपुरात तो पीएमटीचे क्लासेस करतो. नेहमीप्रमाणे वैभव क्लास आटोपून बुधवारी सायंकाळी ६.४५च्या सुमारास जगदीश सावजी जवळून जात होता. त्याला एका जणाने थांबवले. आपल्या मारवाडी मित्राने येथे नवीन शोरूम लावले. ते कुठे आहे, अशी विचारणा केली. पत्ता माहित नसल्याचे सांगून वैभव जायला निघाला. तेवढ्यात दुसरा एक त्याच्याजवळ निघाला. आपण हरिद्वारवरून आलो आहे. तू काही दान करू शकतो काय, अशी विचारणा त्याने केली. वैभवने त्याला १० रुपये दिले असता त्याने हातचलाखी करून ५० ची नोट परत केली. ‘तुझे पैसे नको, आपल्याला सिद्धी प्राप्त असून, तू जास्त पैसे ठेवल्यास जास्त रक्कम तुला मिळेल असेही आरोपी म्हणाला. वैभवने काही विचारण्यापूर्वीच पहिल्या आरोपीने तुला सिद्धी प्राप्त असल्याचा काय पुरावा आहे‘, अशी दुसऱ्याकडे विचारणा केली. त्यावर तुमच्या मनात काय सुरू आहे,असे मी ओळखू शकतो, असे दुसऱ्या आरोपीने सांगितले. त्यानंतर वैभवला पहिल्या आरोपीने बाजूला नेले आणि तू कोणत्या देवाला मानतो, असे विचारले.
वैभवने बजरंगबलीचे नाव घेताच पहिला आरोपी दुसऱ्याजवळ आला. सांग आमच्या मनात कोणता देव आहे,असे विचारले. तुम्ही दोघे बजरंगबलीला मानता, असे सांगून, तुम्हाला लगेच हनुमानजींचे दर्शन घडवतो, असेही आरोपी म्हणाला. त्यानंतर पहिल्या आरोपीला दुसऱ्याने २१ पावलं पुढे जा, तुला दर्शन घडेल, असे म्हटले. त्यानुसार, पहिला आरोपी काही पावल. पुढे गेला आणि धावतच मागे परतला. त्याने दुसऱ्या आरोपीच्या पायावर लोटांगण घातले. आपल्याला समोर लख्ख प्रकाश दिसला अन् वेगळ्या सुखाची अनुभूती आल्याचे तो म्हणाला’, ते ऐकून वैभवही भारावला. आरोपीच्या सांगण्यानुसार, जवळचे २५०० रुपये आणि मोबाईल तसेच घड्याळ रुमालात काढून ते आरोपींच्या जवळ ठेवले अन् २१ पावलं पुढे गेला. मागे परत आला तेव्हा दोन्ही भामटे गायब होते. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने वैभवने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)

एटीएममधून काढले पैसे
वैभवला गंडा घालणारे दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत नाही, असे दाखवत होते. पहिला आरोपी दुसऱ्यावर अविश्वास दाखवत होता. ही बनवाबनवी करतानाच शेवटच्या घटकेला रक्कम (१० रुपयांचे ५० रुपये) मिळणार म्हणून त्याने वैभवला एटीएममधून २५०० रुपये काढायला लावले. अर्ध्या-पाऊण तासाच्या कालावधीत संमोहन केल्याप्रमाणे वैभवही आरोपींच्या मनासारखाच वागू लागला होता. दरम्यान, २५०० रुपये, १० हजारांचा मोबाईल अन् घड्याळ घेऊन आरोपींनी पलायन केल्यानंतर वैभव ठाण्यात पोहचला. त्याने सांगितलेल्या वर्णनानुसार, सीताबर्डीचे पोलीस उपनिरीक्षक के. आर. गवई यांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Fraud by the temptation to face crisis crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.