तीन कोटींचा गंडा : बिल्डर कोंडावार बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:36 PM2019-05-10T21:36:10+5:302019-05-10T21:36:53+5:30
कंपनीच्या संचालकांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीच्या नावाने तीन कोटींचे कर्ज उचलणाऱ्या आणि नंतर ही रक्कम स्वत:च हडप करणाऱ्या बिल्डर कोंडावर बंधूंविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कंपनीच्या संचालकांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीच्या नावाने तीन कोटींचे कर्ज उचलणाऱ्या आणि नंतर ही रक्कम स्वत:च हडप करणाऱ्या बिल्डर कोंडावर बंधूंविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गोपाल लक्ष्मणराव कोंडावार (वय ५२) तसेच संजय लक्ष्मणराव कोंडावार (वय ४८), अशी आरोपींची नावे आहेत.
कोंडावार बंधू रामदासपेठेत राहतात. त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने युनिक अॅग्रो प्रोसेसर इंडिया लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली होती. अमरावती मार्गावरील म्हाडा कॉम्प्लेक्समध्ये कंपनीचे कार्यालय होते. मे २०१२ मध्ये कोंडावार बंधूंनी कंपनीच्या संचालक तसेच पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रे तयार केली. २ मे २०१२ ला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची कागदोपत्री सभा (बैठक) दाखविली आणि त्या बैठकीचा एक बनावट ठराव तयार केला. या ठरावावर कंपनीच्या माजी चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर तसेच दोन संचालकांच्या बनावट सह्या केल्या. या बनावट ठरावाची कागदपत्रे पुसद अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या गांधीबाग शाखेतून तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले. याच बँकेत स्वत:चे खाते उघडून कर्जाचे तीन कोटी रुपये आपल्या बँक खात्यात वळते केले. कोंडावार बंधूंची जगदंबा रिअल इस्टेट कंपनी लि. आहे. कोंडावार बंधूंनी कर्जाची संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने जगदंबा रिअल इस्टेट कंपनीत वळती करून घेतली.
सात वर्षांनंतर बनवाबनवी उघड
सात वर्षांपूर्वी केलेल्या कोंडावार बंधूंच्या या बनवाबनवीची कुणकुण लागल्यानंतर कंपनीच्या संचालकांनी त्यांना जाब विचारणे सुरू केले. कोंडावार बंधू चूक मान्य करण्याऐवजी निर्ढावलेपणा दाखवत असल्याने, कंपनीच्या संचालकांसोबत त्यांचा वाद वाढत गेला. कोंडावार बंधूंनी कर्ज कंपनीच्या नावे घेतले आणि ते आपल्या स्वत:च्या खात्यात (रिअल इस्टेट) खात्यात वळते केल्यामुळे, कंपनीच्या संचालकांचा रोष वाढला. खुशाल महादेवराव गेडाम (वय ८५) यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर कोंडावार बंधूंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.