बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:19+5:302021-01-25T04:09:19+5:30
अरुण महाजन लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : माजी सैनिक व पाेलीस विभागातील अधिकाऱ्यांपासून तर शिपायांपर्यतच्या कर्मचाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाऊंट ...
अरुण महाजन
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : माजी सैनिक व पाेलीस विभागातील अधिकाऱ्यांपासून तर शिपायांपर्यतच्या कर्मचाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्याचा वापर करीत मूळ युजर्सकडे पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी पाेलिसांसमाेर नवीन आव्हान निर्माण झाले आहे.
सुनील यादव, रा. खापरखेडा, ता. सावनेर हे माजी सैनिक असून, त्यांचे कुणीतरी बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आहे. संबंधिताने त्या बनावट फेसबुक अकाऊंटचा वापर करीत त्यांच्या मित्राला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ती रक्कम गुगल पेद्वारे खात्यात जमा करण्याची सूचना केली. त्यामुळे मित्राने फाेन करून सुनील यादव यांना विचारणा केल्याने हा प्रकार उघड झाला. त्यामुळे सुनील यादव यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर त्यांच्या मित्राला पैसे मागितल्याचा फोटो आणि मजकूर पोस्ट केला होता.
त्यांनी अशा बनावट फेसबुक अकाऊंट व त्यातून हाेणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनही केले हाेते. त्यांच्या काही मित्रांनी हा मजकूर वाचल्यावर त्यांच्याकडे आधी फेसबुक रिक्वेस्ट पाठवून नंतर १० हजार रुपये मागितले असल्याची फेसबुक मॅसेंजरवरील चॅटिंगची स्क्रिनशॉट पोस्ट केले. पुढे सुनील यादव यांनी याबाबत खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकाराबाबत नागपूर ग्रामीणच्या सायबर क्राईमला माहिती दिल्याचे सांगितले. ही पाेस्ट वाचून अनेक मित्रांनी आपल्याला फाेन करून किती पैशाची गरज आहे, अशी विचारणा केली. मित्रांना फाेनवर समजावून सांगताना नाकीनऊ आल्याचेही त्यांनी सांगितले.
...
ही काळजी घ्या
मागील काही महिन्यात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेकांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले आहेत. त्या फेसबुक अकाऊंटचा वापर करून अश्लील शिवीगाळ केली जात असल्याचा प्रकारही पुढे आला आहे. खबरदारी म्हणून काहींनी याबाबत पाेलिसात तक्रारी नाेंदविल्या आहेत. फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड, स्वतःचे नाव, आपला वापरात असलेल्या मोबाईल क्रमांक, वाहन क्रमांक, जन्मतारीख असे ठेवणाऱ्यांबाबत हा प्रकार घडत आहे. फेसबुक अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून अल्फान्युमेरिक पासवर्ड ठेवावा. जुने पासवर्ड बदलून दक्षता घ्यावी. त्याचबरोबर मोबाईल फोनवर अथवा कॉम्प्युटरवर फेसबुक अकाऊंट चालू करताना स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड कोणाला दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी, मित्र, मैत्रिणीला आपले फेसबुक वापरण्यास देऊ नये व पासवर्ड शेअर करू नये. दुसऱ्याच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट तयार करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा आहे. वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता, फॅमिली फोटो, शाळेचे नाव इत्यादी फेसबुकवर कोणाला शेअर करू नका, अशा दक्षतेच्या सूचना पाेलिसांनी दिल्या आहेत.
...
फेसबुक अकाऊंट हॅक करून डमी अकाऊंट तयार करण्यात येत आहे. त्यानंतर मेसेंजरचा उपयोग करून जवळच्या मित्रांना पेटीएम, गुगल पेद्वारे पैसे मागण्याचा प्रयत्न होत आहेत. तरी कोणाला असा मेसेज आला तर त्यांनी फोनवरून खात्री करावी. असा प्रकार इतरांशी घडू नये, यासाठी त्यांनी त्यांचे फेसबुक प्रोफाईल ब्लॉक करून ठेवावेत.
- अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण.