गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक, व्यावसायिकाची तक्रार; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 08:19 PM2022-05-20T20:19:26+5:302022-05-20T20:20:02+5:30
व्यवसायात गुंतवणूक करून भरघोस नफा देण्याच्या बहाण्याने हुंडी दलालाने व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
नागपूर : व्यवसायात गुंतवणूक करून भरघोस नफा देण्याच्या बहाण्याने हुंडी दलालाने व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. उद्योजक अशोक गोयल यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी या फसवणुकीचा मुख्य सूत्रधार व्यापारी, त्याची पत्नी आणि दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात ४५ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. जगदीश सीताराम करवा, त्याची पत्नी संगीता करवा, भाऊ हेमंत करवा आणि राजेश करवा अशी आरोपींची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश करवा हुंडी दलाल म्हणून काम करतो. तो मोठ्या व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देत असे. गुंतवणूकदारांना वेळेवर नफा परत मिळाल्याने सुरुवातीला व्यवसाय जोमात सुरू झाला व मोठी गुंतवणूक येऊ लागली. दाल मिल संचालक अशोक गोयल यांची जगदीश करवा याच्याशी नोव्हेंबर २०२० मध्ये ओळख झाली होती.
करवाने गोयल यांना मोठमोठ्या थापा मारल्या. दोन-तीन वेळा चर्चा झाल्यानंतर गोयल यांना करवाबाबत विश्वास बसला. गोयल यांनी ३ नोव्हेंबर २०२० रोजी करवाला तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावे ४५ लाख रुपये दिले. करवाने ज्या तीन कंपन्यांच्या नावे पैसे घेतले त्यांचे धनादेश आणि लेटरहेड गोयल यांच्याकडे सुपूर्द केले. यावरून गोयल यांना खात्री पटली की ज्या फर्मच्या नावावर पैसे घेतले होते त्यांची संमती होती.
करारानुसार, ३ महिन्यानंतर गोयल यांनी करवाला गुंतवणुकीची रक्कम आणि नफा परत करण्यास सांगितले. करवाने विविध सबबी सांगून गोयल यांना पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. दरम्यान, इतवारीच्या हुंडी दलालाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर गोयल यांनी करवा यांनी दिलेला धनादेश आणि लेटरहेड तपासले असता धक्कादायक खुलासा समोर आला. करवाची अनेक बँकांमध्ये खाती आहेत. या खात्यांचे धनादेश त्यांनी गोयल यांना दिले.
या धनादेशावर करवाने ज्या फर्मच्या नावाने पैसे घेतले होते त्याचा बनावट शिक्का लावला होता. तसेच करवाने तिन्ही फर्मच्या नावे बनावट लेटरहेड तयार करून गोयल यांना हमीपत्र दिले. स्वतःचा छापखाना असल्याने करवाने सहज बनावट सील आणि लेटरहेड बनवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गोयल यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासाअंती पोलिसांनी जगदीश करवासह चौघांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अनेक व्यापाऱ्यांची गुंतवणूक
‘लोकमत’ने वर्षभरापूर्वी हा घोटाळा उघडकीस आणला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतवारी आणि पूर्व नागपुरातील अनेक बड्या व्यावसायिकांनी करवाजवळ कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बहुतांश लोकांनी रोख रक्कम दिली आहे. यामुळे ते तक्रार देण्यासही टाळाटाळ करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर अनेक प्रकरणे समोर येऊ शकतात. आरोपींनी फसवणूक केलेली रक्कम पद्धतशीरपणे इतर शहरात राहणाऱ्या नातेवाईकांना सुपूर्द केल्याचा पोलिसांना संशय आहे.