सावजाच्या शोधात असलेला भामटा स्वत:च अडकला आरपीएफच्या जाळ्यात

By नरेश डोंगरे | Published: June 11, 2024 10:15 PM2024-06-11T22:15:03+5:302024-06-11T22:15:12+5:30

झडतीत मोबाइल सापडला : चोरीची कबुली, आरपीएफची कारवाई

fraudster arrested, got himself caught in the RPF's net | सावजाच्या शोधात असलेला भामटा स्वत:च अडकला आरपीएफच्या जाळ्यात

सावजाच्या शोधात असलेला भामटा स्वत:च अडकला आरपीएफच्या जाळ्यात

नरेश डोंगरे - नागपूर : सावजाच्या शोधात असलेला एक भामटा स्वत:च आरपीएफच्या ताब्यात आला. तो सराईत चोरटा असल्याचे प्राथमिक चाैकशीत उघड झाले. त्यामुळे आरपीएफच्या जवानांनी त्याला जेरबंद केले. उमेश अनिल भोयर (वय ३३) असे त्याचे नाव असून तो सिंदी (रेल्वे, जि. वर्धा) येथील रहिवासी आहे.

नेहमीप्रमाणे आज रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि त्यांचे सहकारी गुन्हेगारांच्या शोधात असताना रेल्वे स्थानक परिसरात गर्दीच्या ठिकाणी एक भामटा संशयास्पद अवस्थेत घुटमळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्याजवळ आढळलेल्या मोबाइलबद्दल आणि स्वत:बद्दल तो असंबद्ध माहिती देत असल्याने त्याची थोडी 'खातर' केली असता त्याने त्याच्याजवळ असलेला मोबाइल चोरीचा असल्याची कबुली दिली. शिवाय आजही तो चोरीच्या इराद्याने सावज हेरत होता, अशीही कबुली दिली. त्यामुळे त्याला नंतर रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) स्वाधीन करण्यात आले. वरिष्ठ सुरक्षा आयुक्त मनोजकुमार आणि सहायक सुरक्षा आयुक्त श्रीकुमार करूप यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

इकडे चाैकशी, तिकडे झाली पोलखोल
आरपीएफ ठाण्यात आरोपी उमेश भोयरची चाैकशी सुरू असतानाच त्याच्याजवळचा फोन खणखणला. त्यामुळे आरोपीला आरपीएफने फोनचा स्पिकर सुरू करून बोलण्यास सांगितले. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने हा आपला फोन असून, तुमच्याकडे कसा आला, अशी विचारणा केली. एवढेच नव्हे तर हा फोन ८ जूनला रात्री रेल्वे स्थानक, नागपूर येथून चोरीला गेल्याचीही माहिती दिली. ऐनवेळी पोलखोल झाल्याने आरोपीने तो फोन चोरल्याचे कबूल केले.

Web Title: fraudster arrested, got himself caught in the RPF's net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.