ठगबाज प्रॉपर्टी डीलरला जामीन नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:10 AM2021-01-21T04:10:02+5:302021-01-21T04:10:02+5:30
नागपूर : बनावट शपथपत्राद्वारे शेतीची विक्री करणारा प्राॅपर्टी डीलर शिवदास इंगळे याला न्यायालयाने अग्रीम जामीन देण्यास नकार दिला आहे. ...
नागपूर : बनावट शपथपत्राद्वारे शेतीची विक्री करणारा प्राॅपर्टी डीलर शिवदास इंगळे याला न्यायालयाने अग्रीम जामीन देण्यास नकार दिला आहे. अटकेच्या भीतीमुळे इंगळेशी निगडित लोक भूमिगत झाले आहेत.
जुना सुभेदार ले-आऊट निवासी शिवदास इंगळेच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी ३१ नोव्हेंबर २०२० रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. तक्रारकर्ता मुकेश मेश्राम यांची एमआयडीसी येथील इसासनीमध्ये जमीन आहे. इंगळेने आपल्या सासऱ्याच्या मदतीने बनवाट शपथपत्र बनवून जमिनीची विक्री केली होती. त्यानंतर मेश्राम यांनी इंगळे व त्याच्या सासऱ्याविरोधात एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात मेश्राम यांना सातत्याने धमकावले जात असल्याचे पुढे आले आहे. अटकेपासून वाचण्यासाठी इंगळे याने कोर्टात शरणागती पत्करली होती. मात्र, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आहे. या प्रकरणात इंगळेसोबतच त्याचे साथीदारही सहभागी आहेत. त्यांच्याच मदतीने इंगळे फरार असून, त्याच्या अटकेनंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे. मेश्राम यांनी या प्रकरणाची तक्रार अजनी ठाण्यातही दाखल केली आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार इंगळे याने अनेकांना अशाच प्रकारे फसवले आहे.