चक्क सरकारी जागेचे प्लॉट तयार करून अनेकांना विक्री; ग्राहकांना लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 02:31 PM2022-06-06T14:31:17+5:302022-06-06T14:38:23+5:30
आतापर्यंत समोर आलेल्या ग्राहकांना त्याने २४ लाखांचा गंडा घातला असून, सहा वर्षांच्या कालावधीत अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.
नागपूर : शासकीय जागेला खासगी लेआउट दाखवून त्याच्या प्लॉटची विक्री करून अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी सेवकराम इकाजी पटेल (५४, पुनापूर, पारडी) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या ग्राहकांना त्याने २४ लाखांचा गंडा घातला असून, सहा वर्षांच्या कालावधीत अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.
सुनीता नामदेव लवणकर यांनी यासंदर्भात वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पटेल याच्या मानसी हाउसिंग एजन्सी लेआउटमधील १,५७५ चौरस फुटांचा प्लॉट क्रमांक १६४ विकत घेतला. २०१६ मध्ये हा सौदा झाला. आरोपीने त्यांना १०० रुपयांच्या मुद्रांकावर कब्जापत्र तयार करून दिले. मात्र, प्लॉटची मोजणी करून देण्यास तो टाळाटाळ करीत होता. वारंवार विचारणा करूनदेखील तो प्लॉटची मोजणी करून देत नसल्याने अखेर सुनीता यांनी प्लॉटच्या परिसराला भेट दिली. यावेळी त्यांना धक्काच बसला. संबंधित परिसरात लांब भिंत बांधण्यात आली होती. त्यांनी विचारपूस केली असता आरोपी पटेलने चक्क शासकीय जागा स्वत:ची आहे असे दर्शवीत अनेकांना प्लॉट विकले होते. स्वत:ची पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पटेलने आतापर्यंत बऱ्याच जणांची एकूण २४ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका प्लॉटची दोघांना विक्री
आरोपी पटेल याने अशा पद्धतीने शहरातील अनेक जणांना गंडा घातल्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. त्याने शासकीय जमिनीवरील एकाच प्लॉटची दोन जणांना विक्री केल्याचा प्रकारदेखील समोर आला आहे.