दुरांतो एक्स्प्रेसमध्ये मिळणार मोफत बेडरोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2023 08:45 PM2023-01-05T20:45:11+5:302023-01-05T20:47:19+5:30
Nagpur News नागपूर- मुंबई- नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये पुढच्या महिन्यापासून बेडरोलची सुविधा मोफत मिळणार आहे.
नागपूर : नागपूर- मुंबई- नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये पुढच्या महिन्यापासून बेडरोलची सुविधा मोफत मिळणार आहे, २५ फेब्रुवारीला यापूर्वी करण्यात आलेला करार रद्द होणार असल्याने २६ फेब्रुवारीपासून प्रवाशांना ही सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.
हावडा- पुणे- हावडा दुरांतो, हावडा- मुंबई- हावडा दुरांतो, राजधानी एक्स्प्रेस, अजनी- पुणे- अजनीसह विविध मार्गांवर धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांमध्ये बेडरोलसाठी प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जात नाही. मात्र, नागपूर- मुंबई- नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांकडून बेडरोलसाठी २५० रुपये घेण्यात येते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड रोष आहे. या संबंधाने प्रवासी तसेच प्रवासी संघटनांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाकडेही तक्रारी केल्या आहेत.
या संबंधाने प्रवाशांकडून विचारणा झाल्यास रेल्वेचे अधिकारी बेडरोलच्या माध्यमातून २.५० कोटी रुपये जमविण्याचा युक्तिवाद करीत होते. मात्र, प्रवाशांचा रोष वाढतच असल्याने संबंधित अधिकारीही अनेकदा गप्प बसत होते. प्रवाशांच्या असंतोषाचा भडका उडू नये, म्हणून वर्षभराचा करार संपुष्टात आल्याने रेल्वे प्रशासनाने हा करार पुन्हा वाढविण्यास इन्कार केल्याचे समजते. त्याचमुळे २६ फेब्रुवारीपासून प्रवाशांना मोफत बेडरोल मिळणार आहे.
पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होती योजना
नागपूर- मुंबई- नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये ‘पेड बेडरोल’ ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली होती. एकूणच या योजनेचे परिणाम लक्षात घेतल्यानंतर आता करार संपल्यानंतर प्रवाशांना मोफत बेडरोल देण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील यांनी दिली.
----