रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहक वाहनांना माेफत डिझेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:08 AM2021-05-22T04:08:42+5:302021-05-22T04:08:42+5:30
धामणा : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गाेंडखैरी परिसरात कमलेशसिंग चव्हाण यांचा पेट्राेलपंप असून, त्यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारत काेराेना रुग्णांची वाहतूक ...
धामणा : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गाेंडखैरी परिसरात कमलेशसिंग चव्हाण यांचा पेट्राेलपंप असून, त्यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारत काेराेना रुग्णांची वाहतूक करणाऱ्या रुग्णवाहिका व ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ५० लिटर डिझेल माेफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद सभापती भारती पाटील यांनी या उपक्रमाचा गुरुवारी (दि. २०) शुभारंभ केला.
शुभारंभानंतर १२ रुग्णवाहिकांना ५० लिटर डिझेल माेफत देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. जिल्हा प्रशासन अथवा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे पत्र घेऊन येणाऱ्या नोंदणीकृत खासगी अथवा सरकारी रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा लाभ घेता येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता उराडे, डाॅ. सत्यवान वैद्य, सरपंच तुषार चौधरी, आरोग्यसेविका कुंदा सहारे, सुनील कापसे, राजेश रोडे, तुषार सरोदे, अमित कंडे, आशिष कोल्हे, रामकृष्ण टापरे बादी उपस्थित हाेते.