भीम अॅप आणि डेबिट कार्डद्वारे विनाशुल्क वीज बिल भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 10:20 AM2018-04-10T10:20:23+5:302018-04-10T10:20:34+5:30
वीज ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या महावितरणने आता भीम अॅप आणि डेबिट कार्र्डद्वारे वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या महावितरणने आता भीम अॅप आणि डेबिट कार्र्डद्वारे वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ५०० रुपयांपेक्षा अधिकच्या वीज बिलाचा भीम अॅप आणि डेबिट कार्डद्वारे भरणा करणाऱ्या ग्राहकांना जवळपास पाऊण ते एक टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागत होते. आता हे अतिरिक्त शुल्क महावितरण भरणार असून ग्राहकांना केवळ वीज बिलाची रक्कम भरावी लागणार आहे. या सुविधेचा अधिकाधिक ग्राहकांना लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता रफीक शेख यांनी केले आहे.
महावितरणकडून आॅनलाईन वीज बिल भरणा अधिक सुलभ करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून हे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. अशावेळी वीज ग्राहकांनी भरउन्हात वीज बिल भरणा करण्यासाठी रांगेत लागण्यापेक्षा घरबसल्या स्मार्ट फोन किंवा इंटरनेटचा वापर करून वीज देयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यापूर्वी डेबिट कार्डद्वारे ५०० रुपयांपर्यंतचा वीज बिल भरणा सुविधा शुल्काशिवाय होत असे. तर डेबिट कार्डद्वारे भरणा होणाऱ्या पाचशे ते दोन हजार रुपयांच्या वीज बिलासाठी ०.६ टक्के आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असे जवळपास ०.७१ टक्के तर दोन हजारापेक्षा अधिकच्या बिलासाठी ०.८२ टक्के व त्यावर १८ टक्के जीएसटी असे सुमारे ०.९७ टक्के सुविधा शुल्क आकारले जात. वीज बिलाच्या एकूण रकमेच्या पाऊण ते एक टक्का असलेले हे सुविधा शुल्क आता महावितरणकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे डेबिट कार्डद्वारे वीज बिलाचा भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांवर अतिरिक्त सुविधा शुल्काचा बोजा पडणार नाही, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.