कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी नि:शुल्क लाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:07 AM2021-04-28T04:07:39+5:302021-04-28T04:07:39+5:30
लाेकमत इम्पॅक्ट लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
लाेकमत इम्पॅक्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशान्वये मनपाचे उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना यासंबंधी पत्र पाठविले आहे.
महापालिकेच्या एकूण १६ दहनघाटांपैकी ६ दहनघाटांवर ब्रिकेट्सद्वारे नि:शुल्क अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तर लाकडांकरिता शुल्क आकारण्यात येत होते. लाेकमत’ने ही बाब मंगळवारी वृत्ताद्वारे मांडली. त्याची दखल घेत यापुढे शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच कोराेनामुळे मृत पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व दहनघाटावर मोफत लाकडे उपलब्ध करण्याला मनपाने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व घाटांवर कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी नि:शुल्क लाकडे पुरविण्यात येतील.
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आता सहकारनगर, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम, गंगाबाई, मानकापूर या दहनघाटांवर कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्काराकरिता पुढील आदेशापर्यंत नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या आदेशाची सर्व झोनस्तरावर अंमलबजावणी केली जाणार आहे. मनपातील माजी विधी सभापती धर्मपाल मेश्राम यांनी सर्व घाटावर मोफत लाकडे उपलब्ध करण्याची मागणी केली होती.