शाडू व शेणाच्या मूर्ती विक्रीसाठी नि:शुल्क जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:21 PM2019-08-20T23:21:22+5:302019-08-20T23:23:06+5:30
शाडू व शेणाच्या मूर्ती नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील कस्तूरचंद पार्कसह इतर ठिकाणी या मूर्ती विक्रेत्यांना महापालिका नि:शुल्क जागा उपलब्ध करणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका प्रशासनातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी तयारी सुरू आहे. पीओपी मूर्तींबाबत न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे पालन केले जाईल. शाडू व शेणाच्या मूर्ती नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील कस्तूरचंद पार्कसह इतर ठिकाणी या मूर्ती विक्रेत्यांना महापालिका नि:शुल्क जागा उपलब्ध करणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी दिली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उद्देशाने शहरातील गणेश मंडळ व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची महापौर यांच्या अध्यक्षतेत महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालिक डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था व गणेश मंडळांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वयंसेवी संस्था व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना आणि संकल्पना मांडल्या. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी मातीच्या मूर्तींचीच स्थापना करावी. निर्माल्य तलावामध्ये विसर्जित न करता मनपा व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडे देण्याचे आवाहन करण्यात आले. गणपती मंडळांच्या परवानगीसाठी यावर्षीही झोनस्तरावर सुविधा सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली.
अनिल सोले म्हणाले, शहरातील पर्यावरणपूरक गणेशेत्सव साजरा करण्यामध्ये स्वयंसेवी संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. मनपा आणि नागरिकांमध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून स्वयंसेवी संस्था कार्य करतात. कोणत्याही समाजोपयोगी गोष्टीचे यश समाजाच्या प्रतिसादावर अवलंबून असते. स्वयंसेवी संस्थांच्या सहकायार्मुळेच नागपूरने नाव मिळविले आहे. आत कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जनाच्या बाबतीत नागपूर अग्रेसर आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वयंसेवी संस्थांसह गणपती मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विसर्जन ठिकाणी दिवसभर स्वच्छता राहावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय विद्युत व्यवस्थेसह सुरळीत वाहतूक राहावी यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन वीरेंद्र कुकरेजा यांनी केले.
प्रारंभी ग्रीन व्हीजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी पीओपी मूर्तींच्या दुष्परिणामाची माहिती दिली. नागरिकांना कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व इतर सहकायार्साठी ग्रीन व्हीजील यंदाही मनपाच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. नियमानुसार पीओपी विक्री करणाऱ्यांनी त्यासंदर्भातील नियमांचे फलक लावणे आवश्यक आहे. मूर्तीमागे लाल खूण करणेही आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सुनील कांबळे यांनी तर आभार भावना सोनकुसळे यांनी मानले.