नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:46 AM2019-03-05T00:46:28+5:302019-03-05T00:47:38+5:30

वर्षानुवर्ष रखडलेल्या नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वे लाईनचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे बोर्डाने १०६-१५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी ९२२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबत रेल्वे बोर्डाचे संचालक धनंजय सिंह यांनी सोमवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठविले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सोईन आणि दपूम रेल्वे नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी ‘लोकमत’शी बोलताना या बाबीची पुष्टी केली. ६ मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Free the route for Nagpur-Nagbhid broad gauge | नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचा मार्ग मोकळा

नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचा मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्देरेल्वे बोर्डाकडून ९२२ कोटी मंजूर : दपूम रेल्वे प्रशासनाला मिळाले पत्र, ६ ला भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : वर्षानुवर्ष रखडलेल्या नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वे लाईनचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे बोर्डाने १०६-१५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी ९२२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबत रेल्वे बोर्डाचे संचालक धनंजय सिंह यांनी सोमवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठविले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सोईन आणि दपूम रेल्वे नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी ‘लोकमत’शी बोलताना या बाबीची पुष्टी केली. ६ मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागांतर्गत नॅरोगेज रेल्वे लाईनला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेले ९२२ कोटी रुपयातील ५० टक्के रक्कम राज्य शासनाला खर्च करावी लागणार आहे. या प्रकल्पाची घोषणा २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च ३७६ कोटी रुपये होता. त्यातील १८८ कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले होते. परंतु त्यानंतरही हा प्रकल्प नीती आयोगात अडकला होता. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत वाढली. राज्य शासनावर अतिरिक्त १६५ कोटी रुपयाचा बोजा आला आहे. या प्रकल्पाला चार वर्ष उशीर झाल्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढून ९२२ कोटी रुपये झाली आहे. नागपूरला चंद्रपूर जिल्ह्याशी जोडण्यासाठी नागभीड रेल्वे मार्गाला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित केल्यानंतर या मार्गावर एक्स्प्रेस रेल्वेगाड्या चालविल्या जाऊ शकतात. सोबतच मुंबई, नागपूर, गोंदिया, कोलकाता तसेच गोंदिया, वडसा, नागभीड, चंद्रपूरवरून हैदराबादपर्यंतच्या मार्गाचा विकास होईल. हा मार्ग ब्रॉडगेज झाल्यास नागपूर ते नागभीड दरम्यानच्या गावांची आर्थिक स्थिती बदलणार आहे.
प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश
या प्रकल्पासाठी जानेवारी महिन्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती. यात त्यांनी या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ४ मार्चला रेल्वे बोर्डाने या ब्रॉडगेज प्रकल्पासाठी मंजुरी दिल्याचे पत्र दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाला पाठविले आहे. यात प्रकल्पाचा खर्च ९२२ कोटी रुपये दर्शविण्यात आला आहे. यात सिव्हिल वर्कसाठी ६७३ कोटी आणि इलेक्ट्रिक वर्कसाठी १८२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Web Title: Free the route for Nagpur-Nagbhid broad gauge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.