शिक्षकांची कोरोनाच्या कामातून मुक्तता करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:57+5:302021-06-16T04:09:57+5:30
नागपूर : शिक्षक कर्मचाऱ्यांना तहसीलदाराचा धाक दाखवित कोरोनाचे काम करून घेत आहे. कोणत्याही शिक्षकाला नियुक्ती आदेश, कार्यमुक्ती प्रमाणपत्र, तसेच ...
नागपूर : शिक्षक कर्मचाऱ्यांना तहसीलदाराचा धाक दाखवित कोरोनाचे काम करून घेत आहे. कोणत्याही शिक्षकाला नियुक्ती आदेश, कार्यमुक्ती प्रमाणपत्र, तसेच सुरक्षिततेचे कोणतेही साधन सामग्री नाही, उलट प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नेमणूक करून दैनंदिन सर्व्हे, लसीकरणाचे दैनंदिन अहवाल केंद्रप्रमुखांना सादर करावे लागत आहे. त्यामुळे या सर्व कामातून शिक्षकांना मुक्त करावे, अशा मागणीचे निवेदन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांना देण्यात आले. नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाच्या झालेल्या चर्चेत फुटाणे यांनी विमाशीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, संघटनेचे विष्णू राणे, विजय गोमकर, विशाल बंड, रूपचंद ठवकर, सुरेंद्र नारनवरे आदी उपस्थित होते.
- दहावीचा निकाल कसा लावायचा
माध्यमिक शाळामध्ये इयत्ता दहावी निकालाच्या संदर्भात मूल्यमापनाची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असून, निकाल व इतर प्रपत्रे ३० जूनपर्यंत विभागीय मंडळात जमा करायचे आहे. प.शिक्षक सद्या कोरोना सर्वेक्षण व कोविड सेंटरवर ड्युटी करीत आहे. दहावीचे निकालाचे काम विहित मुदतीत करावयाचे असल्याने शिक्षकांना कोविड ड्युटीतून मुक्त करा, तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांना पुढे बारावीच्या निकालाची कार्यवाही करावयाची असल्याने कोविड लसीकरण केंद्र व सर्वेक्षण कार्याच्या यादीतून त्यांची नावे वगळण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आली. संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, प्रा.संजय खेडीकर, प्रा.सपन नेहरोत्रा, भरत रेहपाडे, दीपक नागपूरे, देवीदास नंदेश्वर यांच्यातर्फे उपजिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.