नागपूर शहर बसमध्ये शहिदांच्या पत्नींना मोफत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:52 PM2018-05-10T12:52:38+5:302018-05-10T12:58:51+5:30
महापालिकेच्या शहर बसमध्ये शहीद जवानांच्या पत्नींना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव परिवहन समितीच्या पुढील बैठकीत ठेवला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या शहर बसमध्ये शहीद जवानांच्या पत्नींना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव परिवहन समितीच्या पुढील बैठकीत ठेवला जाणार आहे. तसेच परिवहन समितीच्या अर्थसंकल्पात समितीचे सभापती याची अधिकृत घोषणा करणार आहेत.
देशाची सेवा करताना शहीद झालेले सैनिक, केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे जवान, पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन विभागातील शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीला मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. परिवहन समिती अर्थसंकल्प १८ मे रोजी स्थायी समितीला सादर केला जाणार आहे.
या अर्थसंकल्पात शहिदांच्या पत्नींना मोफत प्रवासासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. परिवहन समितीच्या मंजुरीनंतर याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाईल.
‘कॉमन मोबिलिटी कार्ड’
नागपूर शहरात २०१८-१९ या वर्षात मेट्रो धावण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने शहर बस व मेट्रो रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ‘कॉमन मोबिलिटी कार्ड ’योजना राबविली जाणार आहे. या कार्डाच्या माध्यमातून प्रवाशांना मेट्रो रेल्वे व शहर बसमधून प्रवास करता येणार आहे. यासाठी अत्याधुनिक तिकीट मशीन खरेदी करण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे.
दारू पिणाऱ्या चालकावर कारवाई
शहर बसच्या चालकांनी दारू पिऊन बस चालवू नये यासाठी ड्युटीवर रुजू होताना थम्ब मशीनवर हजेरी लावतानाच चालकांची मशीनद्वारे तपासणी केली जाणार आहे. यासाठी परिवहन विभागाने मशीन खरेदी केल्या आहेत. तसेच चालकांनी दारू पिऊन बस चालवू नये यासाठी भरारी पथकाद्वारे चालकांची आकस्मिक तपासणी केली जाणार आहे. यामुळे अपघाताला आळा बसणार असल्याचा विश्वास सभापती बंटी कुकडे यांनी व्यक्त केला.
मोरभवन बसस्थानकाचा विकास
महापालिका व महाराष्ट्र राज्य मार्ग परिहवन महामंडळ मोरभवन बसस्थानकाच्या मागील बाजूला बसस्थानकाचा विकास कणार आहे. तसेच शहराच्या पूर्व भागातील वाठोडा येथील महापालिकेच्या १०.८० एकर जागेवर डिझेल बस आॅपरेटरला जागा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच वाडी नाका येथे इथेनॉलवर धावणाऱ्या ग्रीनबससाठी डेपो उभारला जाणार आहे.