नागपुरात ‘एमएलसी’च्या नावावर नि:शुल्क उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:41 AM2018-04-07T01:41:28+5:302018-04-07T01:41:39+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘मेडिको लिगल केस’च्या (एमएलसी) नावावर नि:शुल्क उपचार होत तर नाही ना, असा संशय बळावल्याने रुग्णालय प्रशासनाने त्या दृष्टीने चौकशीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये गेल्या वर्षभरापासून एकाच पोलिसाच्या नावाने ‘एमएलसी’ प्रकरण दाखल होत असल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘मेडिको लिगल केस’च्या (एमएलसी) नावावर नि:शुल्क उपचार होत तर नाही ना, असा संशय बळावल्याने रुग्णालय प्रशासनाने त्या दृष्टीने चौकशीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये गेल्या वर्षभरापासून एकाच पोलिसाच्या नावाने ‘एमएलसी’ प्रकरण दाखल होत असल्याचे उघडकीस आले आहे.
अपघातात जखमीसह गुन्ह्याच्या संबंधित प्रकरणे व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला अपघात झालेली प्रकरणे ‘एमएलसी’मध्ये मोडतात. अशा रुग्णाची मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) किंवा अपघात विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) तपासणी केल्यानंतर हे प्रकरण ‘एमएलसी’ असल्याची शहनिशा करून रुग्णाच्या नोंदणी कार्डवर ‘एमएलसी’चा शिक्का मारतात. अशा रुग्णांवर नियमानुसार मोफत उपचार केला जातो. एक्स-रे, सिटीस्कॅन, एमआरआय काढण्यासाठी पैसे लागत नाही. थेट रुग्णालयात ‘एमएलसी’ रुग्ण आल्यानंतर काही वेळेने डॉक्टर मेडिकल पोलीस चौकीला कळवून माहिती देतात. तसेच रुग्णालयात वा परिसरात ‘एमएलसी’ केसेस आढळल्यास पोलीस चौकीतील हवालदार संबंधित रुग्णाच्या सोबत राहतो. हवालदाराने ‘एफआयआर’ दाखल केल्यानंतर रुग्णाच्या कार्डवर पोलिसाचे नाव व बक्कल नंबर असतो. अशा रुग्णांनाही संबंधित विभागात उपचार मोफत असतो. परंतु, गेल्या वर्षभरापासून मेडिकलमध्येच नाही तर मेयोमध्येही ‘एमएलसी’ रुग्णाच्या नावावर मोफत उपचार घेण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सूत्रानुसार, मेडिकलमधील अनेक प्रकरणात ‘एमएलसी’ रुग्णाच्या नोंदणी कार्डवर एकाच पोलिसाचे नाव व बक्कल नंबर आढळून आले आहे. तर काहींवर हे सुद्धा नसल्याचे सामोर आले आहे. याला गंभीरतेने घेत वैद्यकीय अधीक्षकांनी चौकशीला सुरुवात केली असल्याची माहिती आहे.