जागतिक पाेपट दिनी ४३ पाेपटांची मुक्तता
By निशांत वानखेडे | Published: June 1, 2024 04:34 PM2024-06-01T16:34:09+5:302024-06-01T16:35:15+5:30
वनविभागाची धडक कारवाई : प्लम हेडेड, राेज रिंग जातीचे हाेते पाेपट
नागपूर : विक्रीसाठी पकडून आणून पिंजऱ्यात डांबून ठेवलेल्या ४३ पाेपटांची वनविभागाच्या पथकाने मुक्तता केली. माेतीबाग परिसरात राहणाऱ्या आराेपीच्या घरून सर्व पाेपट ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे जागतिक पाेपट दिनी ही कारवाई करण्यात आली.
वन्यजीव हितासाठी कार्यरत पीपल्स फाॅर अॅनिमल या संस्थेने माेतीबाग येथील छाेटू नामक पाेपट विक्रेत्याच्या घरी माेठ्या संख्येने पाेपट असल्याची माहिती वनविभागाला दिली. हे पाेपट माेतीबाग, लकडगंज, माेमीनपुरा भागात विकले जाणार असल्याचीही माहिती मिळाली. या माहितीची सत्यता तपासून नागपूरचे उपवनसंरक्षक डाॅ. भारत सिंह हाडा, मानद वन्यजीव संरक्षक अजिंक्य भटकर, डिएफओ प्रीतम सिंह काेडापे यांच्या मार्गदर्शनात व वनपरिक्षेत्र अधिकारी सारीका वैरागडे यांच्या नेतृत्वात याेजना आखून शुक्रवारी सायंकाळी माेतीबाग परिसरात आराेपीच्या घरी धडक कारवाई करण्यात आली.
कारवाईमध्ये आराेपीच्या घरी प्लम हेडेड, राेज रिंग जातीचे ४३ पाेपट आढळून आले. या पाेपटांना वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षण प्राप्त आहे. यानंतर सर्व पाेपटांची निसर्गात मुक्तता करण्यात आली. या कारवाईमध्ये पीपल्स फाॅर अॅनिमल संस्थेचे आशिष काेहळे, स्वप्नील बाेधाने, अंकिता खलाेडे, अविनाश शेंडे, आदर्श निनावे, निशांत खाेब्रागडे, वनविभागाचे क्षेत्र सहायक रामकृष्ण इरपाची, राम गिरी व वनरक्षक प्रियंका भलावी यांचा समावेश हाेता.