नागपूर शहरातील वाहतूक सुकर करण्यासाठी फ्रान्सचे ‘बूस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 09:45 PM2018-08-28T21:45:45+5:302018-08-28T21:47:12+5:30
शहरातील सार्वजनिक वाहतूक सुकर करण्यासाठी लोकांना मदत करणे शक्य आहे. यातून शहरातील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. यासाठी शहरी गतिशीलता (अर्बन मोबिलिटी) प्रकल्पांतर्गत एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) ने देशातील तीन शहरांची निवड केली आहे. यात नागपूरसह कोची व अहमदाबादचा समावेश आहे. या प्रकल्पाला सर्वप्रथम नागपुरात सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला याचाच एक भाग म्हणून मदत केली जात आहे. एएफडी महापालिकेला तांत्रिक सहकार्य करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सार्वजनिक वाहतूक सुकर करण्यासाठी लोकांना मदत करणे शक्य आहे. यातून शहरातील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. यासाठी शहरी गतिशीलता (अर्बन मोबिलिटी) प्रकल्पांतर्गत एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) ने देशातील तीन शहरांची निवड केली आहे. यात नागपूरसह कोची व अहमदाबादचा समावेश आहे. या प्रकल्पाला सर्वप्रथम नागपुरात सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला याचाच एक भाग म्हणून मदत केली जात आहे. एएफडी महापालिकेला तांत्रिक सहकार्य करणार आहे. यातून शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम व सुकर करण्याला मदत करणार असल्याची माहिती एएफडीचे लीड ट्रान्सपोर्ट स्पेशॅलिस्ट अर्नाड डॉफिन यांनी मंगळवारी दिली. ‘शाश्वत शहरी गतिशीलतेला प्रोत्साहन’ यावर आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
डॉफिन म्हणाले, २०१४ सालापासून भारतातील विविध शहरात एएफडी काम करीत आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला कर्ज उपलब्ध करण्यासोबतच तांत्रिक मुद्यावर सहकार्य करीत आहे. मेट्रो रेल्वेशी अधिकाधिक प्रवासी जोडण्यासाठी फीडर बससेवा सुरू करण्याची योजना आहे. सोबतच रोजगार उपलब्ध करण्यासाठी मदत करणार आहे. नागपूर महापालिकेसोबत मोबिलिटी प्रकल्पांतर्गत तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. याचा आराखडा एएफडी तयार करणार आहे.
वाहतूक व्यवस्था डिजिटल केली जाणार आहे. यासाठी अॅप तयार करण्यात येतील. ई-बाईक, ई-सायकल, रिचार्ज स्टेशन अशा प्रकल्पासाठी एएफडी मदत करणार आहे. अशा प्रकल्पाला तांत्रिक सहकार्य करण्याला एएफडीची प्राथमिकता असल्याचे डॉफिन यांनी सांगितले.
इंडिगे्रटेड मल्टीमॉडल सिस्टमच्या माध्यमातून काम क रण्यात येईल. परंतु प्रत्येक शहराची गरज व परिस्थिती वेगवेगळी असते. याचा विचार करून वाहतूक यंत्रणा सक्षम झाली पाहिजे.
एएफडी(भारत)च्या सहसंचालक क्लेमेन्स डी ला ब्लॅच म्हणाल्या, एएफडी मागील दहा वर्षापासून भारतात अर्बन मोबिलिटीवर काम करीत आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहे. नागपूर शहरातही विस्तृत परियोजनेवर काम सुरू आहे. तंत्रज्ञानातून अनेक अडचणी सहज सोडविता येतात. यातील वाहतूक यंत्रणा ही एक आहे.
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे म्हणाले, फ्रान्स देशातील तीन शहरातील वाहतूक यंत्रणा सुधारण्यासाठी मदत करीत आहे. यात नागपूरचा समावेश आहे. करारानंतर प्रथमच अर्बन मोबिलिटीवर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यातील चर्चेनंतर विस्तृत मोबिलिटी आराखडा तयार केला जाणार आहे. कार्यशाळेत देश-विदेशातील ६० प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. यावेळी भारताच्या युरोपियन युनियन प्रतिनिधी वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक स्मिता सिंग, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे समन्वयक मॅथ्यू अर्नाड, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट भारताच्या सहसंचालक क्लेमेन्स विडाल डी ला ब्लॅच, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे प्रकल्प अधिकारी रजनीश अहुजा आदी उपस्थित होते.
तीन मिलियन युरोची मदत
एएफडी देशातील निवड करण्यात आलेल्या तीन शहरांसाठी तीन मिलियन युरो निधी देणार आहे. यात नागपूर शहराला किती रक्कम मिळणार असा प्रश्न केला असता, अर्नाड स्पष्ट बोलू शकले नाही. मात्र ज्या कामासाठी गरज भासेल त्यासाठी हा निधी उपलब्ध केला जाईल. शहराला एक मिलियन युरो देण्याची कोणत्याही स्वरूपाची अट घातलेली नाही. विशेष म्हणजे एक मिलियन युरो म्हणजेच ही रक्कम ८.२१ कोटींच्या आसपास होते.
दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
नागपूर महानगरपालिका, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) व युरोपियन युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपुरातील ‘शाश्वत शहरी गतिशीलतेला प्रोत्साहन’(प्रमोटिंग सस्टेनेबल अर्बन मोबिलिटी इन नागपूर)या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,आयुक्त वीरेंद्र सिंह, डॉ. रामनाथ सोनवणे, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे लिड ट्रान्सपोर्ट स्पेशालिस्ट अर्नाड डॉफीन, भारताच्या युरोपियन युनियन प्रतिनिधी वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक स्मिता सिंग, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे समन्वयक मॅथ्यू अर्नाड, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट भारताच्या सहसंचालक क्लेमेन्स विडाल डी ला ब्लॅच, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे प्रकल्प अधिकारी रजनीश अहुजा, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे ग्रँट आॅफिसर जतीन अरोरा, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटच्या संपर्क अधिकारी राधिका टाकरू यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो, नीरी, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.