मित्र, मैत्रिणीचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:04+5:302021-07-20T04:07:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वेगात आलेल्या ट्रकने माेटरसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या माेटरसायकलस्वार मित्र ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : वेगात आलेल्या ट्रकने माेटरसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या माेटरसायकलस्वार मित्र व मैत्रिणीचा मृत्यू झाला. ही घटना साेमवारी (दि. १९) दुपारी १.२० वाजताच्या सुमारास कामठी शहरातील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील जयस्तंभ चाैकात घडली.
वैभव सुरेश शंभरकर, रा. काशीनगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपूर व मोहिनी कृष्णबिहारी तिवारी (२०, रा. मोतीबाग, रेल्वे क्वाॅर्टर, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. वैभव सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये सुपरवायझर म्हणून तर माेहिनी रनाळा, ता. कामठी येथील खासगी कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नाेकरी करायची. माेहिनी साेमवारी सकाळी कामावर आली आणि मध्येच दुपारी सुटी घेतली. ते दाेघेही एमएच-४९/डब्ल्यू-६५६८ क्रमांकाच्या माेटरसायकलने रनाळाहून कन्हान (ता. पारशिवनी)च्या दिशेने जायला निघाले.
कामठी शहरातील जयस्तंभ चाैकात पाेहाेचताच मागून आलेल्या व माैदा शहराच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४०/बीएल-७४४४ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दाेघांच्याही डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लगेच कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती दाेघांनाही मृत घाेषित केले. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून ट्रकचालक सोनू माणिक सहारे (२६, रा. न्यू येरखेडा, ता. कामठी) यास अटक केली. हा ट्रक साेनू सहारे याच्याच मालकीचा असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक कल्पना कटरे करीत आहेत.
....
जुळ्या बहिणीला जबर धक्का
पाेलिसांनी या अपघाताची माहिती वैभव व माेहिनीच्या कुटुंबीयांना दिल्याने दाेघांचेही कुटुंबीय कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आले हाेते. यात मृत माेहिनीची जुळी बहीण (धाकटी) कृतिकाचाही समावेश हाेता. रुग्णालयात येईपर्यंत तिला माेहिनीच्या मृत्यूबाबत माहिती नव्हते. थाेरली बहीण कायमची गेल्याचे कळताच ती बेशुद्ध पडली. तिलाही उपचारार्थ काठी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.