पावसातच साजरी केली ‘फ्रेण्डशिप’; काही ठिकाणी मिळाला पोलिसांचा दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 06:50 AM2020-08-03T06:50:00+5:302020-08-03T06:50:02+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ईद, फ्रेण्डशिप डे, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन व पोलीस यंत्रणेने आधीच गर्दी टाळण्याचा इशारा दिलेला होता. त्याच अनुषंगाने रविवारी अवघे नागपूर अत्यंत शांत भासत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाची रिमझिम बरसात अन् त्यात हातात हात घालून मित्रांचे हुंदडणे. सोबतीला भुट्टा अन् एक प्याली चाय... असे सुरेख वातावरण मैत्रीदिनाला जुळून आले होते. मात्र, कोरोना संसर्गाची भीती आणि शासन-प्रशासनाकडून आधीच मिळालेला सूचक इशारा यामुळे यंदा म्हणावा तसा उत्साह नव्हता. जिथे कुठे असा उत्साह दाखवण्याचा प्रयत्न युवावर्गाने केला तेथे पोलिसी दंडुक्याचा सामना करावा लागला. मात्र, बऱ्याच दिवसापासून हुलकावणी दिलेल्या पावसाने आज जोरदार बरसत ‘फ्रेण्डशिप’ साजरी केली असे म्हणता येईल.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ईद, फ्रेण्डशिप डे, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन व पोलीस यंत्रणेने आधीच गर्दी टाळण्याचा इशारा दिलेला होता. त्याच अनुषंगाने रविवारी अवघे नागपूर अत्यंत शांत भासत होते. एरवी फे्रण्डशिप डे म्हटला की तरुणाईच्या सर्वाधिक पसंतीचे स्थळ असलेल्या फुटाळ्यावर चिक्कार गर्दी उसळत असे. मैत्री दिन म्हटला की डीजे, बॅण्डपथक व अनेक मनोरंजक कार्यक्रम असायचेच. अंबाझरी गार्डन तलावाच्या काठावरही मित्र-मैत्रिणींचे घोळके जल्लोष साजरा करताना दिसत होते. नव्यानेच बनलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकालाही पसंती असतेच. मात्र, ही सगळी स्थळे यंदा ओस पडली होती. म्हणायला इक्का-दुक्का तरुणांचा मार्ग या स्थळांकडे वळत होता. मात्र, पोलिसांचा ताफा दिसताच आल्या पावलाने परत फिरत होते. ही स्थिती असतानाही काही अतिउत्साही तरुणांनी वस्त्यांमधील गल्लीबोळ गाठत एकमेकांना शुभेच्छा देण्याचा प्रताप केला.
संसर्गाच्या प्रकोपातही हा प्रताप जीवघेणा आहे, याचे भान त्यांना नव्हते. काही ठिकाणी टारगट पोरांच्या शिगेला पोहोचलेल्या उत्साहाला पोलिसी दंडुक्याचा सामना करावा लागला. मुले ऐकत नाही म्हटल्यावर जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळणारी पोरे व ज्या रस्त्यावर सापडतील त्या रस्त्यांवर पिच्छा करणारे पोलीस असा पळापळीचा खेळ दिसून येत होता. दुपारी ३ वाजतापर्यंतची ही स्थिती असताना ढगांचा गडगडाट झाला आणि जोराच्या सरी कोसळल्याने न ऐकणाºया तरुणांची हौस फिटली आणि पोलिसांनाही अतिरिक्त परिश्रमापासून थोडी मोकळीक मिळाली. संध्याकाळपर्यंत पावसाने धूम ठोकल्याने पुन्हा कुठे गर्दी दिसून आली नाही. सूर्यास्त होताच बाजारपेठा व दुकाने बंद करण्याचे आदेश असल्याने सर्वत्र शांतता पसरली होती. एरवी मैत्रीदिनाची संध्याकाळच रंगीन असते, तीच संध्याकाळ बेरंग होती. एकूणच, इतर सणोत्सवाप्रमाणेच तरुणांच्या हक्काचा दिवसही ओस गेला. मात्र, सोशल माध्यमांवर मैत्रीपर्व सुरूच होते.