नागपुरात ‘फ्रेंडशीप डे’ची ‘धूम’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 09:27 PM2018-08-04T21:27:03+5:302018-08-04T21:30:37+5:30
‘फ्रेंडशीप डे‘ आॅगस्टच्या पहिल्या रविवारी येत असल्याने सर्वाधिक निराशा होते ती शाळेतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची. मात्र ते मार्ग काढतातच. रविवारऐवजी शनिवारीच विविध महाविद्यालयांमध्ये ‘फ्रेंडशीप डे’चा माहोल दिसून येत होता. अनेकांनी तर पालकांच्या परवानगीने आजच पार्टी उरकून टाकली. त्याचप्रमाणे सोशल नेटवर्किंग साईट्सवरदेखील शुभेच्छा देणे सुरू झाले. दुसरीकडे ‘फ्रेंडशीप डे’च्या निमित्ताने बरेच तरुण-तरुणी समाजातील उपेक्षितांकडे मैत्रीचा हात समोर करून सामाजिक भानदेखील जपणार आहेत, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘फ्रेंडशीप डे‘ आॅगस्टच्या पहिल्या रविवारी येत असल्याने सर्वाधिक निराशा होते ती शाळेतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची. मात्र ते मार्ग काढतातच. रविवारऐवजी शनिवारीच विविध महाविद्यालयांमध्ये ‘फ्रेंडशीप डे’चा माहोल दिसून येत होता. अनेकांनी तर पालकांच्या परवानगीने आजच पार्टी उरकून टाकली. त्याचप्रमाणे सोशल नेटवर्किंग साईट्सवरदेखील शुभेच्छा देणे सुरू झाले. दुसरीकडे ‘फ्रेंडशीप डे’च्या निमित्ताने बरेच तरुण-तरुणी समाजातील उपेक्षितांकडे मैत्रीचा हात समोर करून सामाजिक भानदेखील जपणार आहेत, हे विशेष.
महाविद्यालये नुकतीच सुरू झाली असल्याने विद्यार्थ्यांनादेखील अभ्यासाचे फारसे ‘टेन्शन’ नाही. त्यातच कॉलेजजीवनाची सुरुवात झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तर मैत्रीचा हा दिवस साजरा करण्यासाठी फारच उत्सुकता दिसून येत आहे. शनिवारी महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये, कट्ट्यावर, कॅन्टीनमध्ये ‘फ्रेंडशीप डे’चेच वातावरण होते. याशिवाय फुटाळा, ट्रॅफिक पार्क इत्यादी तरुणाईने बहरलेल्या जागांवर जास्तच गर्दी होती.
अनेकांनी आपापल्या परीने ‘सेलिब्रेशन’चे ‘प्लॅन’ केले आहेत. कट्ट्यांवर चहा पिताना ‘फ्रेंडशीप डे’चे प्लॅन्स तयार होत होते. फ्रेंडशीप डेनिमित्त अनेक तरुण मंडळी मस्तपैकी बाहेर जाऊन एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहेत तर अनेकांनी पार्टीचा बेत आखलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा पाऊस नसला तरी उत्साहात कुठेही कमी आलेली दिसून आलेली नाही.
‘सेल्फी’ विथ ‘फ्रेंड’
‘फ्रेंडशीप डे’च्या निमित्ताने आपल्या आवडत्या मित्र-मैत्रिणीसोबत ‘सेल्फी’ काढून ‘सोशल मीडिया’वर ‘पोस्ट’ करण्यावर तरुणाईचा भर आहे. यासोबतच आवडता पाळीव प्राणी, गॅझेट्स यांनादेखील मित्राचे स्थान देण्यात ‘यंगिस्तान’ आघाडीवर आहे. ‘फ्रेंडशीप डे’च्या दिवशी तर ‘सेल्फीज्’चा ‘आॅनलाईन’ चावडीवर अक्षरश: पाऊस पडणार आहे. अनेक महाविद्यालयांमध्येदेखील एक दिवस अगोदरच ‘सेलिब्रेशन’ सुरू असताना ‘सेल्फी’ला उधाण आले होते.
‘फ्रेंडशीप डे’चा सामाजिक रंग
फ्रेन्डशीप डेचे समीकरण जुळलेलेच आहे ते पार्टी, मज्जा आणि मस्ती यांच्याशी. यामुळे युवकांनी केवळ धांगडधिंगा करायचा एक दिवस अशी यावर टीकादेखील होते. मात्र उपराजधानीतील काही विद्यार्थी व विद्यार्थिनी मात्र मैत्रीदिनाच्या माध्यमातूनच समाजातील उपेक्षितांकडे मैत्रीचा हात समोर करणार आहेत. शहरातील काही विद्यार्थ्यांनी मात्र हा दिवस समाजातील अशा लोकांसोबत साजरा करण्याचे ठरविले आहे ज्यांना खरोखरच प्रेमाची नितांत आवश्यकता आहे. काही युवक रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक मित्रत्व निभावणार आहेत, तर काही तरुण-तरुणी अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमांना भेट देणार आहेत.
भटक्या कुत्र्यांसमवेत ‘फ्रेंडशीप डे’
शहरातील ‘सेव्ह स्पीचलेस आॅर्गनायझेशन’तर्फे तर भटक्या कुत्र्यांसमवेत हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. जनावरांवर होणारे अत्याचार बंद व्हावेत व समाजात ‘प्लास्टिक’चा उपयोगदेखील संपावा, यासाठी यावेळी जनजागृतीदेखील करण्यात येणार आहे. जिथे ओळखीच्यांना भेटायला सवड नाही, तेथे जनावरांकडे लक्ष द्यायला तर लोकांकडे अजिबात वेळच नसतो. ‘फ्रेंडशीप डे’ आहे म्हणून केवळ दाखविण्यासाठी मुक्या जनावरांना जवळ घेऊ नका. त्यांना वर्षभर तुमची गरज आहे. त्यांच्यापासून दूर जाऊ नका, उलट त्यांना तुमच्या प्रेमाने जवळ करा, असे मत या संस्थेच्या अध्यक्षा स्मिता मिरे यांनी व्यक्त केले.
बाजारपेठांमध्ये उत्साह
फ्रेंडशीप डे साजरा करण्यासाठी गेल्या आठवड्यापासूनच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. शहरातील अनेक हॉटेल्स, पब्ज येथेदेखील विशेष तयारी करण्यात आली आहे. सदर, रामदासपेठ, लॉ कॉलेज चौक, सीताबर्डी, धरमपेठ, महाल व लक्ष्मीनगर या भागांतील गिफ्ट शॉपींमध्येदेखील युवक-युवतींची गर्दी दिसून आली. विशेषत: फ्रेंडशीप बॅन्डचे अनेक नवनवीन प्रकार बाजारात दिसून येत आहेत.