४ फेब्रुवारीपासून भाजपची ‘गाव चलो’ मोहीम, गावागावात जाऊन साधणार संवाद
By योगेश पांडे | Published: January 25, 2024 10:05 PM2024-01-25T22:05:58+5:302024-01-25T22:07:28+5:30
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
नागपूर: आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटन मजबुतीवर परत भर देण्यास सुरुवात केली आहे. निवडणूका जाहीर होईपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधण्याच्या दृष्टीने ४ फेब्रुवारीपासून गाव चलो मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल व ग्रामीण भागावर जास्त भर राहणार आहे.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, प्रवक्ते चंदन गोस्वामी, अश्विनी जिचकार, गुड्डू त्रिवेदी, राम अंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते. या मोहीमेअंतर्गत जिल्हा समितीत १५ संयोजक राहणार असून त्यात भाजपचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचादेखील समावेश असेल. जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधीदेखील यात सहभागी होतील. एक गाव एक कार्यकर्ता अशी यात संकल्पना राहणार आहे. या मोहीमेअंतर्गत समाजातील विविध घटकांशी संपर्क करून संवाद साधण्यात येईल.
तसेच जनतेपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविल्या जाईल. कमीत कमी १० टक्के मतदानवाढ व्हावी यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येतील. भाजपचे पदाधिकारी या मोहीमेदरम्यान शहीद जवान व पोलिसांच्या कुटुंबियांचीदेखील भेट घेतील. त्याचप्रमाणे इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचीदेखील भेट घेण्यात येईल, अशी माहिती भेंडे यांनी दिली.